तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या लेखापालाने मागितली पाच हजारांची लाच; ठेकेदाराची तक्रार
By नारायण बडगुजर | Updated: September 27, 2023 22:51 IST2023-09-27T22:51:02+5:302023-09-27T22:51:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या लेखापालाने बिल काढून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला ...

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या लेखापालाने मागितली पाच हजारांची लाच; ठेकेदाराची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या लेखापालाने बिल काढून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लेखापालावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाणत गुरुवारी (दि. २७) गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणामुळे मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नरेंद्र अनंतराव कणसे (५५), गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या ३८ वर्षीय ठेकेदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची पडताळणी करून गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र कणसे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत लेखापाल (वर्ग ३) आहेत. तक्रारदार ठेकेदाराला तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा स्मशानभूमीतील गॅस शवदाह वाहिनीचा ठेका मिळालेला आहे. तसेच कोविडच्या काळात तळेागव दाभाडे नगरपरिषद हद्दीत सॅनिटायझरची फवारणीचाही ठेका त्यांना मिळाला होता. सॅनिटायझर फवारणीचे बिल मंजूर करण्यासाठी लेखापाल कणसे याने तक्रारदार ठेकेदाराकडे बिलाच्या एक टक्का रकमेची मागणी केली होती.
मात्र, त्यांनी ती रक्कम दिली नाही. तसेच सध्या तक्रारदार ठेकेदाराचे गॅस शवदाह वाहिनीचे बिल नरेंद्र कणसे यांच्याकडे प्रलंबित आहे. हे बिल काढण्यासाठी व मागील बिल काढण्यासाठी एक टक्क्याप्रमाणे लाच मागणी केल्याची तक्रार ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केले.
ठेकेदाराच्या तक्रारीची पडताळणी केली असता नरेंद्र कणसे याने बिल काढून देण्याचा मोबदला म्हणून पाच हजारांची लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.