पुणे : पुण्याला बदली हवी होती, त्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे मागितले, ते पैसे देण्यासाठी सावकारांकडून ३० टक्के व्याजदराने ८४ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर पैशांसाठी सावरकरांनी तगादा लावला होता. त्याचबरोबर त्या अधिकाऱ्याच्या झालेल्या फसवणूकीमुळे सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये सोमवारी घडली.
आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव गणेश शंकर शिंदे (वय ५२) असे आहे. याप्रकरणी शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी आणि त्यांचे वडील, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा, पंधरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील विजय सोनी, क्षीरसागर, साळुंखे आणि हाजरा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे हे सहकार विभागाच्या मुंबई कार्यालयात लेखाधिकारी होते. शिंदे यांनी मुंबईहून पुण्याला बदली हवी होती. बदलीकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी शिंदे यानी आरोपी सावकारांकडून ८४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी २० ते ३० टक्के व्याजदर आकारण्यात आला होता. या पैशासाठी आरोपींनी शिंदे यांचा मानसिक व आर्थिक छळ सुरू केला होता.
पंधरकर नावाच्या व्यक्तीने शिंदे यांना १ कोटी रुपयांचे पीएल लॉन करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता शिंदे यांची मोठी आर्थिक रक्कम उकळण्यात आली. ऐनवेळी लोन करून देण्यास नकार दिल्याने शिंदे यांना धक्का बसला होता. आरोपी सावकरांच्या जाचाला कंटाळून शिंदे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईट नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.