पुणे: पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर भाजपने कठोर कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार पुण्यातील ६९ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. यामुळे पक्षशिस्तीचा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने कठोर भूमिका घेत संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई केली.
पक्षविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत आणि संघटनात्मक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. त्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांसाठी पक्षाची दारे पुढील सहा वर्षांसाठी बंद राहणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. या ६९ जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे.