जिल्हा परिषद सभापतींचे खातेवाटप नियमबाह्य
By Admin | Updated: April 15, 2017 03:43 IST2017-04-15T03:43:56+5:302017-04-15T03:43:56+5:30
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी विषय समिती सभापती निवडीनंतर त्यांना केलेले खातेवाटप बेकायदेशीर कामकाज करून केले आहे, असा आरोप शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई

जिल्हा परिषद सभापतींचे खातेवाटप नियमबाह्य
पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी विषय समिती सभापती निवडीनंतर त्यांना केलेले खातेवाटप बेकायदेशीर कामकाज करून केले आहे, असा आरोप शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी केला होता. तसेच, अधिकार नसतानाही अध्यक्षांनी एकतर्फी घोषणा करून हा निर्णय केला असून, त्यात प्रशासनही सामील असल्याचा आक्षेप घेऊन अपील अर्ज विभागीय आयुक्तांकडे दाखल केला होता. त्यामुळे आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट खुलासा आणि सभेच्या प्रोसिडींगची प्रत तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या अर्जात ३ एप्रिल रोजी विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाल्यानंतर शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके यांनी आक्षेप घेतला होता. बुचके आणि सदस्य गुलाबराव पारखे यांनी हा अपील अर्ज केला आहे. अर्जाची तपासणी करून आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना नोटीस पाठवून तत्काळ खुलासा मागितला आहे. आशाताई बुचके यांनी, उद्या (दि. १५) होणाऱ्या आरोग्य, बांधकाम, कृषी पशुसंवर्धन, अर्थ आणि शिक्षण या ६ समित्यांच्या गठनाची प्रक्रिया सभापतींच्या खातेवाटपाचा
अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे. खातेवाटप अवैध असेल तर त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या विषय समित्यांचे गठन होणे अयोग्य असल्याचे नमूद केले आहे. या अर्जामुळे जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उद्या (शनिवारी) या संदर्भात आयुक्त काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)