अष्टापूर चौकात अपघात वाढले

By Admin | Updated: May 11, 2016 00:50 IST2016-05-11T00:50:16+5:302016-05-11T00:50:16+5:30

चौकामध्ये गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी वारंवार करूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Accidents have increased in Ashtapur Chowk | अष्टापूर चौकात अपघात वाढले

अष्टापूर चौकात अपघात वाढले

पिंपरी सांडस : अष्टापूर फाटा चौकात दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे हा चौक मृत्यूचा सापळा बनला आहे. या चौकामध्ये गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी वारंवार करूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाघोली, लोणी कंद केसनंद, अष्टापूर, पिंपरी सांडस आदी अनेक परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. हे खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अष्टापूर, पिंपरी सांडस, वाघोली-बकोरी, तुळापूर फाटा, लोणी कंद-थेऊर यांसारख्या अनेक रस्त्यांची अवस्था बिकट अवस्था झाली आहे. बकोरी रस्त्याच्या दुरुस्तीचे अर्धवट काम करण्यात आले असून, केलेले कामही निकृष्ट आहे. अष्टापूर फाटाच नव्हे तर अनेक ठिकाणचे रस्ते अपघातप्रवण क्षेत्रे बनली आहेत. नादुरुस्त रस्ते, रस्त्यावर अपघातप्रवण क्षेत्राची माहिती देणारे कुठलेही फलक नाहीत. यामुळे वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना जीव गमावावा लागत आहे. नुकताच अष्टापूर फाटा चौकत एका युवकाचा भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. चौकाला मिळणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक नाही. यामुळे वाहने भरधाव वेगाने येतात. या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. परंतु संबंधित विभागाकडे नागरिकांनी गतिरोधक बसवण्याची मागणी करूनदेखील दुर्लक्ष केले जात आहे. अष्टापूर फाटा चौकात आतापर्यंत वीस जणांना मृत्यूने कवटाळले आहे. तरीही संबंधित विभाग जागा झाला नाही.

Web Title: Accidents have increased in Ashtapur Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.