पोलिसाचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: July 4, 2014 06:48 IST2014-07-04T06:48:42+5:302014-07-04T06:48:42+5:30

भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रवीण लक्ष्मण सोनवणे (वय ३२, रा. कावेरीनगर, पोलीस वसाहत, वाकड) या वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला.

Accidental death of policeman | पोलिसाचा अपघाती मृत्यू

पोलिसाचा अपघाती मृत्यू

पिंपरी : भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रवीण लक्ष्मण सोनवणे (वय ३२, रा. कावेरीनगर, पोलीस वसाहत, वाकड) या वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चिंचवड येथील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यापासून काही अंतरावर घडली.
याप्रकरणी सुंदर दगडू रोकडे (४६, रा. चिखली) या मोटारचालकाला अटक केली आहे. फौजदार व्ही. व्ही. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त बंगल्यापासून जवळच एक रिक्षा उभी होती. त्या रिक्षाशेजारीच सोनवणे होते. दरम्यान, मोरवाडीकडून केएसबी चौकाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीने रिक्षाला धडक दिली, त्यामुळे ही रिक्षा सोनवणे यांच्या अंगावर गेली. या अपघातात सोनवणे गंभीर जखमी झाले. दरम्यान, रस्त्याने जात असलेल्या मारुती नरवडे या रिक्षाचालकाने त्यांना उपचारासाठी तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, उपायुक्त राजेंद्र माने, वाहतूक विभागाचे
उपायुक्त विश्वास पांढरे, सहायक आयुक्त महेंद्र रोकडे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. मूळचे बीड जिल्ह्यातील धारगाव येथील सोनवणे २००७ साली पोलीस दलात भरती झाले होते. सध्या ते पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत होते. सध्या वाकड येथील पोलीस वसाहतीत आई व पत्नीसमवेत राहणाऱ्या प्रवीण यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांचे बंधूही पोलीस दलात आहेत. प्रवीण यांच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी थेरगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Accidental death of policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.