अपूर्ण कामांमुळेच अपघात

By Admin | Updated: May 24, 2016 06:07 IST2016-05-24T06:07:37+5:302016-05-24T06:07:37+5:30

बीआरटी मार्गात घुसणारे वाहनचालक, अपूर्ण कामे यांमुळेच नगर रस्ता बीआरटी मार्गावर अपघात होत असल्याचा खुलासा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी केला. अपघातांच्या कारणावरून

Accident due to incomplete work | अपूर्ण कामांमुळेच अपघात

अपूर्ण कामांमुळेच अपघात

पुणे : बीआरटी मार्गात घुसणारे वाहनचालक, अपूर्ण कामे यांमुळेच नगर रस्ता बीआरटी मार्गावर अपघात होत असल्याचा खुलासा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी केला. अपघातांच्या कारणावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न सोमवारच्या सर्वसाधारण सभेत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, मनसेने केला; मात्र महापौर तसेच राष्ट्रवादीचे सभागृह नेते ठाम राहिल्यामुळे तो फसला.
अपूर्ण कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा मार्ग बंद करावा, अशी मागणी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, मनसेचे सदस्य करीत होते; पण महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाचा आधार घेऊन या मागणीतील हवा काढली. पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांच्या खुलाशाने अडचणीत येणार, अशी कल्पना असल्यामुळेच की काय; पण आयुक्त कुणाल कुमार सभागृहातून निघून गेले. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय सदस्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली व अपुऱ्या कामांचा खुलासा त्यांच्याकडेच मागावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांनी तर आयुक्तांमुळेच नगरसेवक, पदाधिकारी विनाकारण बदनाम होत आहेत. तेच या अपघातांना जबाबदार आहेत, अशी टीका केली.
मनसेचे बाळा शेडगे, वसंत मोरे, राजू पवार, किशोर शिंदे यांनी महापौरांवर निशाणा साधत त्यांच्या घाईमुळेच अपघात होत आहेत, असा आरोप केला. काँग्रेसचे अविनाश शिंदे यांनी प्रशासनाला सुनावतानाच महापौरांनाही तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही, याची जाणीव करून दिली. भाजपच्या मुक्ता टिळक, अशोक येनपुरे, धनंजय जाधव यांनी बीआरटी मार्गच चुकीच्या पद्धतीने तयार गेला असल्याचे सांगितले. सेनेच्या पृथ्वीराज सुतार, संजय भोसले यांनी केलेली कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बीआरटी मार्ग बंद ठेवा, ही मागणीच नंतर सर्वांनी उचलून धरली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशाल तांबे, सतीश म्हस्के, महेंद्र पटारे आदींनी चर्चेत भाग घेतला; मात्र सर्वपक्षांची टीका परतवून लावताना खरा किल्ला लढवला तो सभागृह नेते बंडू केमसे यांनी. सुरुवातीला आयुक्त कुणाल कुमार यांनी, तर नंतर कृष्णा यांनी खुलासा केला. महापौर जगताप यांनी अपघात बीआरटीमुळे होतात, हे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. अपूर्ण कामे महिनाभरात पूर्ण होतील, असे आश्वासन प्रशासनाकडून सभागृहाला देऊन त्यांनी मार्ग बंद ठेवण्याची मागणी धुडकावली.

जबाबदारी ढकलू नये
बहुसंख्य सदस्यांचा रोख या मार्गात सातत्याने होत असलेल्या अपघातांवरून सत्ताधारी राष्ट्रवादीला बदनाम करण्याचाच होता. भाजपाचे गणेश बीडकर, मनसेचे राजेंद्र वागसकर, सेनेचे अशोक हरणावळ यांनी तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका वृद्धाच्या बळीला या मार्गाचे घाईघाईने उद््घाटन करणारी राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी कृष्णा, आयुक्त कुणाल कपूर व महापौर या तिघांच्याही महापालिका व पीएमपीएलबरोबर आलेल्या संबंधांचा उल्लेख करून त्यामुळे आता कोणीही एकमेकांवर जबाबदारी ढकलू शकणार नाही, अशी टीका केली.

Web Title: Accident due to incomplete work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.