दुसऱ्या यादीतील प्रवेश आजपासून
By Admin | Updated: July 7, 2016 03:38 IST2016-07-07T03:38:37+5:302016-07-07T03:38:37+5:30
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक व अकरावी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अकरावीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ७ जुलै

दुसऱ्या यादीतील प्रवेश आजपासून
पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक व अकरावी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अकरावीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ७ जुलै ते ९ जुलै या कालावधीत प्रवेश घेता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी ५0 रुपये भरून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाणार आहे, असे सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीतून ५ हजार ४0 विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश देण्यात आले असून, १0 हजार ५२३ विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी मिळाली आहे, असे नमूद करून राऊत म्हणाल्या, की येत्या ७ जुलै रोजी ‘ईद’ सण आहे. मात्र, तरीही महाविद्यालयांमध्ये सकाळी ११ ते ४ या वेळेत प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. ईद सणामुळे काही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही तर या विद्यार्थ्यांनी ८ किंवा ९ जुलै रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत ५0 रुपये भरून प्रवेश निश्चित करावा. शनिवारी बहुतांश सर्व कनिष्ठ महाविद्यालये अर्धवेळ सुरू असतात. मात्र, विद्यार्थी हिताचा विचार करून शनिवारी सकाळी ११ ते ४ या वेळेत सर्व महाविद्यालये सुरू राहणार आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे याबाबतचे परिपत्रक काढले जाणार आहे.
दरम्यान, पहिल्या प्रवेश फेरीतून प्रवेश मिळूनही दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ५0 रुपये भरून प्रवेश निश्चित केला नव्हता. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर गेले आहेत. दुसऱ्या प्रवेश यादीतून या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश आॅनलाइन प्रकियेतून निश्चित होतात त्यांनी नियोजित वेळेमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)