पुरंदरच्या काळदरी खोऱ्यात भात लागणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST2021-07-27T04:12:02+5:302021-07-27T04:12:02+5:30
पुरंदर किल्ला परिसर बहिरवाडी, बांदलवाडी, कोंडकेवाडी या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल अशा भागात तुरळक ठिकाणी भात लागणीची कामे सुरू ...

पुरंदरच्या काळदरी खोऱ्यात भात लागणीला वेग
पुरंदर किल्ला परिसर बहिरवाडी, बांदलवाडी, कोंडकेवाडी या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल अशा भागात तुरळक ठिकाणी भात लागणीची कामे सुरू झाली होती. काळदरी, धनकवडी, दवणेवाडी, मांढर परिसरातील शेतकरी मात्र पावसाच्या प्रतीक्षेत होते. भात रोपांची तरवे टाकल्यावर पावसाने दडी मारल्याने भात रोपांच्या संख्येत घट झाली होती. रोप टाकलेला कालावधी जास्त झाल्यामुळे रोपे लागणी बाहेर जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती पण पावसाने हजेरी लावल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली.
या परिसरात इंद्रायणी वाणा बरोबर इंडम, कर्जत जातीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. संकरीत वाणांचा उत्पादन कालावधी कमी असून पाऊस लांबल्याने भात रोपे कमी उंचीची राहिली असून याचा परिणाम उत्पादनावर होणार नाही ना अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. बांदलवाडी येथील शेतकरी स्वागत कोंढाळकर, मांढर येथील शेतकरी शामराव शिर्के, ज्ञानदेव शिर्के आदींनी भात लागवडीच्या विविध समस्या यावेळी सांगितल्या.
--
कोट
भात लागणीच्या काळात रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी विभागाने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची द्यावे.
तानाजी शिर्के
शेतकरी
--
फोटो क्रमांक : २६ परिंचे काळदरी खोऱ्यात भातलागवडीला वेग