तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाच्या तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:28+5:302021-05-14T04:11:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने प्रत्येक जिल्ह्यात ही लाट रोखण्यासाठी तयारी केली जात ...

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाच्या तयारीला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने प्रत्येक जिल्ह्यात ही लाट रोखण्यासाठी तयारी केली जात आहे. यामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल अशी व्यवस्थाच्या नियोजनाला वेग आला आहे. ससून रुग्णालय लहान मुलांसाठी १०० खाटांची स्वतंत्र व्यवस्था करत आहे. महापालिकेतर्फे येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय तयार करत आहे. याशिवाय, प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यादृष्टीने तयारी केली जात आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना अधिक धोका असेल, असा अंदाज टास्क फोर्सकडून वर्तवला आहे. यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारीला सुरुवात झाली आहे. लहान मुलांना जास्त धोका असला, तरी बहुतांश बालकांमध्ये सौम्य लक्षणे आढळतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून बांधला आहे. त्यादृष्टीने बालरोगतज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन केले जात आहे. महापालिकेकडे सध्या ९ बालरोगतज्ज्ञ आहेत. आणखी २९ बालरोग तज्ज्ञ नेमण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मुलाचे पालकही पॉझिटिव्ह असतील, तर त्यांच्यावरही राजीव गांधी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
ससून सर्वोपचार रुग्णालयात ११ मजली स्वतंत्र इमारतीत एक संपूर्ण मजला कोरोनाग्रस्त लहान मुलांच्या उपचारांसाठी राखून ठेवणार आहे. सुरुवातीला १० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात येईल. गरज भासल्यास खाटांमध्ये वाढ करणार आहे. बालरोगतज्ज्ञाच्या देखरेखीखाली लहान मुलांच्या वॉर्डचे नियोजन केले जाईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.
तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग आढळून येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी लहान बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा गतीने निर्माण कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केल्या आहेत.
--
कसे असेल नियोजन?
ससून सर्वोपचार रुग्णालय : १०० खाटा
राजीव गांधी रुग्णालय, येरवडा : ५० खाटा
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र : ५-१० खाटा
--
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, बहुतांश मुले ही लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेली असतील. तालुका स्तरावर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यादृष्टीने खाटा राखीव ठेवल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे, बालरोगतज्ज्ञांची भरतीही केली जात आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध होण्याबाबत सीएसआर कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद