अनधिकृत टॉवरविषयी नागरिकच उतरले रस्त्यावर
By Admin | Updated: August 31, 2015 04:00 IST2015-08-31T04:00:48+5:302015-08-31T04:00:48+5:30
प्राधिकरण परिसरातील नागरी वसाहतीतील अनधिकृत मोबाईल टॉवर हटवावेत याविषयी वारंवार मागणी करूनही पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

अनधिकृत टॉवरविषयी नागरिकच उतरले रस्त्यावर
पिंपरी : प्राधिकरण परिसरातील नागरी वसाहतीतील अनधिकृत मोबाईल टॉवर हटवावेत याविषयी वारंवार मागणी करूनही पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कारवाई करीत नसल्याने रविवारी उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू सोसायट्यांतील नागरिकच रस्त्यावर उतरले होते.
प्राधिकरण परिसरात सुमारे १०० मोबाईल टॉवर अनधिकृतपणे उभारले आहेत. या टॉवरमुळे पर्यावरण आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे, याबाबत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने आवाज उठविला होता. नवनगर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले होते. या वेळी लवकर यावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी सुरेश जाधव यांनी दिले होते. याबाबतची बैठक होऊनही पंधरा दिवस झाले, तरी कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
आज सकाळी दहाला प्राधिकरण नागरी हक्क सुरक्षा समिती, जागर नागरिक संघाचे कार्यकर्ते सेक्टर २६ मध्ये एकत्र झाले. या वेळी समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संघाचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी, गुणवंत चिखलीकर, मनोहर पद्मन, एम. गोपीनाथन्, रेखा गावडे यांच्यासह महिला, नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यानंतर हा मोर्चा सेक्टर २८ मधील एका टॉवरजवळ आला.
पाटील म्हणाले, ‘‘अनधिकृत टॉवरबाबत प्रधिकरणास निवेदने दिली आहेत. मात्र, आजवर कार्यवाही केलेली नाही. म्हणून तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने रस्त्यावर उतरावे लागत आहे.’’ (प्रतिनिधी)