मार्केट यार्डातील फळ विभागातून वर्षभरात सुमारे दीड लाख दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:22+5:302021-01-08T04:33:22+5:30
पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात वर्षभरात दंडात्मक कारवाई करून १ लाख ४८ हजार ४४४ रुपयांचा दंड वसूल केला ...

मार्केट यार्डातील फळ विभागातून वर्षभरात सुमारे दीड लाख दंड वसूल
पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात वर्षभरात दंडात्मक कारवाई करून १ लाख ४८ हजार ४४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे. गाळ्यापासून १५ फुटांच्या पुढे शेतीमालाची विक्री करणे, अनधिकृतपणे विक्री करणारे विक्रेते, रहदारीस अडथळा करणारी वाहने आणि मास्क न वापरणाऱ्यांवर ही कारवाई केली आहे. फळ विभागाचे गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.
१ नोव्हेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ही कारवाई केली आहे. बाजाराला शिस्त लागावी, यासाठी बाजार समिती प्रशासनच्या वतीने ही कारवाई करण्यात येते. गाळ्यापासून १५ फुटांच्या बाहेर फळे विक्री करण्यास विक्रेत्यांना मज्जाव केला आहे. तरीही काही विक्रेते १५ फुटांच्या बाहेर जाऊन विक्री करतात. त्यांच्यावर आणि वाहतुकीस अडथळा येईल अशा ठिकाणी वाहने लावण्यात येतात. त्या वाहनांच्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. तर काही विक्रेते अनधिकृतपणे विक्री करतात. त्याच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येते. सध्या कोरोना संसर्गाची साथ सुरू आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. पोलीस ठिकठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिक, वाहनचालंकावर कारवाई करत आहेत. याच धर्तीवर बाजार आवारात बाजार समिती प्रशासनाच्या वतीनेही विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. फळ विभागातही अशी कारवाई करण्यात येत असल्याचे कोंडे यांनी सांगितले.