अपहरण करून लुटणारे गजाआड
By Admin | Updated: January 16, 2016 02:38 IST2016-01-16T02:38:18+5:302016-01-16T02:38:18+5:30
सरदवाडी (ता. शिरूर) येथील माणिकचंद कंपनीचे व्यवस्थापक लुईस चार्लेस सिनीठेवन (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांचे कंपनीजवळून अपहरण करून त्यांच्याजवळील सव्वा लाखाचा ऐवज

अपहरण करून लुटणारे गजाआड
शिरूर : सरदवाडी (ता. शिरूर) येथील माणिकचंद कंपनीचे व्यवस्थापक लुईस चार्लेस सिनीठेवन (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांचे कंपनीजवळून अपहरण करून त्यांच्याजवळील सव्वा लाखाचा ऐवज लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी २४ तासांतच गुन्ह्याचा तपास लावून चौघा जणांना गजाआड करण्यात यश मिळविले.
२० डिसेंबर २०१५ रोजी सिनीठेवन कंपनीतून बाहेर पडले असताना काही अंतरावर तिघांनी त्यांच्या कारला हात केला व माणिकचंद फॅक्टरी कुठे आहे, अशी विचारणा केली. तेवढ्यात तिघांपैकी दोघांनी कारचा मागील दरवाजा उघडून प्रवेश केला. सिनीठेवन यांना दोघांनी खेचून मागे ओढले. त्यानंतर पत्ता विचारणाऱ्याने कारचा ताबा घेऊन मोटार पुणे-नगर रस्त्याने अहमदनगर बाजूला नेली. मारण्याची धमकी देऊन त्यांच्याजवळील सव्वा लाखांचा ऐवज काढून घेतला़ यानंतर सिनीठेवन यांना रात्रभर एका अज्ञात ठिकाणी रूममध्ये डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी (२१ डिसेंबर) सकाळी ९ वाजता त्यांना सुपा टोलनाक्याजवळ कारसह सोडून दिले.
१३ जानेवारीस हा गुन्हा शिरूर पोलिसांत दाखल झाला. यानंतर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उत्तम भजनावळे व त्यांच्या पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवली. तपासात कंपनीतील एक कामगारच या गुन्ह्यामागचा सूत्रधार असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी प्रथम सूत्रधारास ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखविल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले. या चार जणांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. सहायक निरीक्षक भजनावळे अधिक तपास करीत आहेत. सोमनाथ वाफगावकर, मधुकर भोईर, श्रीनिवास माने यांचा तपास पथकात समावेश होता.