कुस्त्यांपूर्वी गावपुढाऱ्यात रंगला आखाडा, जोरदार हाणामारी
By Admin | Updated: March 24, 2017 03:50 IST2017-03-24T03:50:57+5:302017-03-24T03:50:57+5:30
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावोगावच्या यात्रांमध्ये भरणारा कुस्त्यांचा आखाडा म्हणजे सर्व पै पाहुणे व कुस्ती शौकीनांचा

कुस्त्यांपूर्वी गावपुढाऱ्यात रंगला आखाडा, जोरदार हाणामारी
यवत : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावोगावच्या यात्रांमध्ये भरणारा कुस्त्यांचा आखाडा म्हणजे सर्व पै पाहुणे व कुस्ती शौकीनांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. अधिक बक्षीस मिळणाऱ्या गावात नामवंत पहिलवान मंडळी कुस्त्या खेळण्यासाठी येतात. मात्र सहजपूर (ता. दौंड) येथील यात्रेच्या आखाडया अगोदर गावातील पुढाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. आखाड्यातील पैलवानांच्या कुस्त्या सुरू होण्यापूर्वीच गावपुढाऱ्यांचाच आखाडा ग्रामस्थांना पाहायला मिळाला.
सहजपूर येथील यात्रेत पहिल्या दिवशी लोकनाट्य, तमाशा सुरु असताना दोन गटांत भांडणे झाली. त्यामुळे तमाशा अर्धवट बंद करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या आखाड्याच्या अगोदर गावपुढाऱ्यांच्या दोन गटात वर्गणीच्या हिशोबावरून तुंबळ मारामारी झाली. याप्रकरणी यवत पोलिस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
ही घटना काल (दि.२२) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सहजपूर येथील मारुती मंदिरासमोर घडली. दोन्ही गटात झालेल्या मारामारीत लाठ्या, काठीसह लोखंडी गजाने व दगड़ाने मारहाण केल्याचे नमूद आहे.
परस्पर विरोधी फिर्यादीत तेजस रमेश म्हेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन उपसभापती सुशांत सुनिल दरेकर, भूषण सुनिल दरेकर,संजय शांताराम दरेकर, मंदार संजय दरेकर, मनोज शिलेदार, जयवंत दरेकर, दत्तात्रय थोरात, सुनिल शांताराम दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर भूषण सुनिल दरेकर यांनी दिलेल्या फियार्दी वरुन माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे, मनोज चांगदेव म्हेत्रे, रोहित मोहन म्हेत्रे, राजू पांडुरंग म्हेत्रे , प्रदीप वसंत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)