गावच्या राजकारणात 'आजी'ने मारली 'बाजी'
By Admin | Updated: October 30, 2015 00:02 IST2015-10-30T00:02:45+5:302015-10-30T00:02:45+5:30
ढोरे भांबुरवाडी (ता. खेड, जि. पुणे) मध्ये ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतरचा आनंद काही वेगळाच होता. कारण होतं ९३ वर्षांची आजीबाई निवडून आल्याचं.

गावच्या राजकारणात 'आजी'ने मारली 'बाजी'
राजेंद्र मांजरे, दावडी
ढोरे भांबुरवाडी (ता. खेड, जि. पुणे) मध्ये ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतरचा आनंद काही वेगळाच होता. कारण होतं ९३ वर्षांची आजीबाई निवडून आल्याचं. नव्वदी पार केल्यानंतर राजकारणात पाऊल ठेवलेल्या या आजीबार्इंच्या गळ््यात पहिल्याच प्रयत्नांत विजयाची माळ पडली. तिची सारी नातवंडं तिला खांद्यावर
घेऊन नाचली.
अवघ्या गावासाठी कौतुकाचा विषय ठरलेल्या या आजीबार्इंचं नाव आहे गंगूबाई निवृत्ती भांबरे. गावात एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होती. त्यातील एका प्रभागात आजीबार्इंनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला धूळ चारत ३० मतांनी विजय मिळवत राजकारणाच्या पदार्पणातच यश मिळवलं. मग काय, गावानं आजीबार्इंची मिरवणूक काढली.
गावातली ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटली, की गावकी-भावकीचं राजकारण आलंच. विरोधकांनी एका महिला उमेदवाराला संधी दिली म्हटल्यावर आपलाही उमेदवार तुल्यबळ हवाच. मग, चर्चा करता करता नाव पुढे आलं, गंगूबाईचं.. नव्वदी पार केलेल्या एका आजीबाईचं. आज्जीला ओळखत नव्हतं, असं गावात कुणीही नव्हतं. मग काय आजीबाई उतरल्या निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या आखाड्यात. त्यांनी जबरदस्त प्रचारही केला. भाषणेही दिली.
आजीचा नातू भरत भांबुरे हे गेल्या वेळी गावाचे उपसरपंच राहिलेले होते. आजीबाई शिकलेल्या नाहीत, पण उपजत शहाणपण आहे. अंगठेबहाद्दर असल्या तरी माणसं ओळखण्याची हुशारी आहे. गोरगरिबांना मदत करणारी आहे.
स्वभावानं चांगली आहे. आजीची स्मरणशक्ती चांगली आहे. गावातला प्रत्येक जण तिला ओळखतो आणि तीदेखील प्रत्येकाला. आजीचं कुणाशी भांडण नाही. नव्वदी पार केली, तरी आजी धडधाकट आहे. चांगलं व्यवहारज्ञानही आहे.
आजही आजीबाई दररोज मंदिरात फिरून येतात. नातलगांना भेटण्यासाठी एकट्याच प्रवास करतात.
लोकांनी आग्रह केला म्हणून
निवडणुकीला उभी राहिले, असं
प्रांजळपणाने त्या सांगतात.