अस्वस्थ तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी : शरद पवार

By निलेश राऊत | Published: April 6, 2024 03:55 PM2024-04-06T15:55:35+5:302024-04-06T15:56:25+5:30

यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवार यांनी निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले....

A separate system is needed to solve the problems of restless youth: Sharad Pawar | अस्वस्थ तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी : शरद पवार

अस्वस्थ तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी : शरद पवार

पुणे : ‘तरुणाईत आलेले नैराश्य हे देशाचे मोठे नुकसान आहे. अशा वेळी राज्य व केंद्र सरकार निर्णय घेत नसेल तर, लोकशाहीत आपण संघर्ष करणे जरुरीचे आहे तसेच तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे’, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

‘अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब’ या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, आमदार अशोक पवार, दीप्ती चवधरी, मोहन जोशी, पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. कुमार सप्तर्षी, भूषणसिंह होळकर, प्रभाकर देशमुख, प्रशांत जगताप, रवींद्र धंगेकर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवार यांनी निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. दरम्यान, प्रशासनातील रिक्त पदे तात्काळ भरली जाणे जरुरी असल्याचे ते म्हणाले. सध्या शासकीय सेवेत कंत्राटी पद्धतीने जी कामगार भरती केली जात आहे, ती अयोग्य असून, ही पद्धती बंद झाली पाहिजे व कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय सेवेतील भरती ही एमपीएससी मार्फत झाली पाहिजे आणि ही भरती करताना होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदा करणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. गेल्या काही वर्षांत २० कोटी जणांना रोजगार दिला जाईल, असे बोलले गेले; पण प्रत्यक्षात ७ लाख जणांना रोजगार मिळाला याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. शासकीय सेवेत सर्व रिक्त जागा लवकर भरताना राज्यात उद्योग-व्यवसाय कसा वाढेल, याचाही विचार करणे जरुरीचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

‘डॉ. सप्तर्षी यांनी ही निवडणूक देशाचे भविष्य घडविणारी असून, परिवर्तनाची लाट आपण अंगावर घेऊन काम केले पाहिजे, असे सांगितले. सध्या तरुणाईच्या वाटेला निराशा आली आहे. जे बुद्धी चालवणार नाही असे तरुण या सरकारला पाहिजे. एक व्यापारी लॉबी देशात काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये वरून कीर्तन आतून तमाशा असेच चालले आहे. अशा वेळी देशाला व्यापारी लॉबीतून मुक्त करण्याचे चॅलेंज असून, तरुणांनी निवडणूक हातात घेणे जरुरी आहे’, असे ते म्हणाले.

भूषणसिंह होळकर यांनी तरुणाईचा प्रश्न सोडवण्यासाठी होळकर नेहमी पुढे असतील असे सांगितले. विद्यार्थ्यांना फी आकारण्यापेक्षा आमदारांचे पगार बंद करा, कशाला त्यांना पैसे पाहिजे. जे तरुणांसाठी आवश्यक आहे ते केले पाहिजे. उद्याचा प्रशासक घडवायचा असेल तर या तरुणाईला बळ दिले पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास पासलकर यांनी केले.

अनेक देशांमध्ये सैन्य दलात मुली माेठ्या प्रमाणात कार्यरत आहेत; पण आपल्याकडे सैन्यदलात मुली नव्हत्या. मी संरक्षण मंत्री असताना हवाई व नौदलाच्या सेवेत मुलींना स्थान देण्याचा निर्णय घेतला. मुलींना सर्व क्षेत्रात संधी मिळाली पाहिजे, ही समाजामध्ये मानसिकता रुजली पाहिजे, असे पवार म्हणाले.

Web Title: A separate system is needed to solve the problems of restless youth: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.