काटी : काटी गावचे, सध्या मुंबई येथे रिलायन्स रिटेल या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर या पदावर असणारे राहुल साहेबराव मोहिते यांनी जागतिक सर्वोच्च शिखर असलेला एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केला. एव्हरेस्ट शिखर हे नेपाळमधील जगातील सर्वांत प्रसिद्ध आणि आव्हानात्मक ट्रेकिंग मार्गांपैकी एक आहे. अनेक गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमी यांचे एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोहोचण्याचे स्वप्न असते, हेच स्वप्न माझे होते, अशी माहिती राहुल मोहिते यांनी दिली.त्यांनी एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक ५,३६४ मीटर व १७,५९८ फूट एवढे अंतर चालून पूर्ण केले. साधारणपणे हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी १२ ते १४ दिवस लागले. १४° सेल्सिअस या ट्रेकमध्ये उंची वाढत जाते. त्यामुळे हवामानाशी जुळवून घेणे खूप महत्त्वाचे असते. उंचीमुळे मळमळ, डोकेदुखी आणि श्वास घ्यायला त्रास होणे यांसारख्या समस्या येतात. अशा सर्व खडतर समस्यांना पार करत हा ट्रेक त्यांनी पूर्ण केला. यासाठी गेल्या एक वर्षापासून त्यांनी घेतलेली मेहनत व आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर हा ट्रेक पूर्ण करून त्यांनी इंदापूरचे नाव जागतिक पातळीपर्यंत पोहोचवले.
हा ट्रेक करण्यापूर्वी त्यांनी वर्षभरात अनेक छोटे-छोटे ट्रेक केले. जवळपास १५ किलो वजन कमी केले. राहुल यांनी धावणे व सायकलिंग हे शारीरिक तंदुरुस्तीसाठी तर, कमी ऑक्सिजनमध्येसुद्धा शारीरिक क्षमता टिकून राहावी, यासाठी श्वसनाचे व्यायाम केले. राहुल यांना भरतवाडी फाउंडेशन आणि इंदापूर रनर्स व सायकल क्लबचे मार्गदर्शन लाभले.