खेड बाजार समितीसाठी ९९ टक्के मतदान
By Admin | Updated: September 14, 2015 04:34 IST2015-09-14T04:34:55+5:302015-09-14T04:34:55+5:30
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात ९९.५० टक्के तर ग्रामपंचायत मतदारसंघात ९९.११ टक्के एवढे मतदान झाले

खेड बाजार समितीसाठी ९९ टक्के मतदान
राजगुरुनगर : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात ९९.५० टक्के तर ग्रामपंचायत मतदारसंघात ९९.११ टक्के एवढे मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली. अतिशय चुरशीची निवडणूक झाल्याने उद्या (१४ सप्टेंबर) निकालाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
सोसायटी मतदारसंघात १,२२३ पैकी १,२१७ मतदारांनी मतदान केले आणि ग्रामपंचायत मतदारसंघात १,२४३ पैकी १,२३२ मतदारांनी मतदान केले. व्यापारी आडते मतदारसंघात ९७.७४ टक्के, हमाल मापाडी मतदारसंघात ९८.५२ टक्के
मतदान केले.
राजगुरुनगर, चाकण, आळंदी, डेहणे, वाडा, कडूस, कुडा, पाईट, आंबोली, करंजविहिरे, वाफगाव, कनेरसर, शेलपिंपळगाव या गावांमध्ये एकूण २९ केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. अनेक केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले.
सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. चुरशीमुळे बहुतेक मतदान केंद्रांवर दुपारी २ पर्यंतच ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. राजगुरुनगर आणि चाकण मतदान केंद्रांवर जास्त मतदान होत. म्हणून बहुतेक उमेदवार या केंद्रावर समर्थकांसह उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. एकही मतदार मतदानाशिवाय राहू नये, याची खबरदारी सर्व तीनही पॅनेलचे उमेदवार घेत होते.
या निवडणुकीत आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास सहकारी पॅनल’ आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ‘भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनल’ हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही पॅनलकडे तगडे उमेदवार असल्याने जबरदस्त लढत आहे. सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण गटात तर अटीतटीची लढत आहेच, पण ग्रामपंचायत मतदारसंघात या वेळी सर्वच तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे निवडणुकीचा कल वर्तविणे अवघड झाले होते.
या दोन्हीही पॅनलने डावललेल्या असंतुष्टांनी ‘संत ज्ञानेश्वर शेतकरी सहकारी पॅनल’ करून निवडणुकीत रंगत आणली आहे. सर्व पॅनेलकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि दागिन्यांचे वाटप झाल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय झाली होती. तसेच शेवटच्या टप्प्यात पॅनेल सोडून उमेदवारांनी वैयक्तिक प्रचार सुरु केल्याने
नेमका अंदाज वर्तविणे अवघड झाले आहे. (वार्ताहर)