९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार ‘टेक्नोसॅव्ही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST2021-02-07T04:10:17+5:302021-02-07T04:10:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उपस्थितांच्या संख्येवर कोरोना महामारीमुळे ...

९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार ‘टेक्नोसॅव्ही’
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उपस्थितांच्या संख्येवर कोरोना महामारीमुळे मर्यादा असणार आहे. तरीही साहित्यप्रेमींच्या संमेलनवारीत खंड पडू नये याकरिता त्यांना घरबसल्या संमेलनाचा आस्वाद घेण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी ‘ऑफलाइन’सोबतच ‘ऑनलाइन’ची जोड दिली जाणार आहे. यू-ट्यूबसह फेसबुकवरून आगामी साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
कुसुमाग्रजांच्या पावनभूमीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाला जोमात सुरुवात झाली आहे. येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान नाशिक येथे साहित्य संमेलन रंगणार आहे. जे साहित्यप्रेमी संमेलनाला येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी संमेलन ऑनलाइन दाखवणार असल्याचे संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.
जातेगावकर म्हणाले की, आम्ही यू-ट्यूबसह फेसबुकवर साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण करणार आहोत. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांत साहित्य संमेलनाच्या थेट प्रक्षेपणाचा (लाईव्ह टेलिकास्ट) प्रयत्न आहे. सोशल मीडियाच्या प्रत्येक व्यासपीठावर संमेलनाची झलक पाहायला मिळेल. अन्य प्रादेशिक भाषांमध्येही प्रक्षेपणाचा विचार आहे.