कोंडिवडेमध्ये ९३ टक्के मतदान
By Admin | Updated: October 28, 2015 23:45 IST2015-10-28T23:45:12+5:302015-10-28T23:45:12+5:30
नाणे मावळातील कांब्रे-कोंडिवडे या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ९३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.

कोंडिवडेमध्ये ९३ टक्के मतदान
कामशेत : नाणे मावळातील कांब्रे-कोंडिवडे या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ९३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.
कांब्रे-कोंडिवडे ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ जागांसाठी २१ उमेदवार आपले नशीब अजमावणार असून, सकाळी बारापर्यंत जवळपास ७५ टक्के मतदान झाले होते.
सकाळी ७.३० ते सायं. ५.३०पर्यंत मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून, एकूण ९३ टक्के मतदान झाले. मतदारांनी सकाळी ७पासूनच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विशेषत: महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता. कांब्रे-कोंडिवडे ग्रुप ग्रामपंचायतीसाठी एकूण तीन मतदान केंद्रे असून, प्रभाग क्रमांक १मध्ये ४६१पैकी ४२५ लोकांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक २मध्ये ५६५पैकी ५०७ जणांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक ३मध्ये ५१०पैकी ४७६ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण १५४४ मतदार असून, १४०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान सर्व केंद्रांवर शांततेत पार पडले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कामशेत पोलिसांनी पोलीस निरीक्षक एल. जी. पांडूने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)