भाटघर धरणात ९ टक्के पाणीसाठा
By Admin | Updated: April 4, 2016 01:27 IST2016-04-04T01:27:35+5:302016-04-04T01:27:35+5:30
दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरूहोण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ९ टक्के तर नीरा देवघर धरणात

भाटघर धरणात ९ टक्के पाणीसाठा
भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरूहोण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ९ टक्के तर नीरा देवघर धरणात २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दोन्ही धरणभागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली आहे. नागरिक व जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.बारामती व फलटण तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १५ मार्चपासून नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेक्सने तर भाटघर धरणातून ७०० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. भोर तालुक्यात २०१५ साली पाऊस कमी प्रमाणात झाल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने न भरता ७० टक्केच भरली होती. तरीही भाटघर धरणातून पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा आता ९ टक्क्यांवर आला आहे. नीरा देवघर धरणातही २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पाण्याचा खांडवा भांडवली गावाच्या खाली आला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी असून धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरी कोरड्या पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी, डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटरी बंद पडत आहेत. त्यामुळे दुसरी मोटर घेऊन मोटर विहिरीपासून धरणाच्या पात्रापर्यंत एक ते दोन किलोमीटरवर पाण्यात टाकून ते पाणी विहिरीत सोडून उचलले जात आहे. यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. यामुळे अनेकदा गाळमिश्रित पाणी पुरवठा होत आहे. दोन मोटारींमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे, त्याला वायर व मंजुरी ही कामे दरवर्षी उन्हाळ्यात करावी लागतात. मात्र हे ग्रामपंचायतींना परवडत नसल्याचे कुरुंजीचे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितले.
नीरा देवघर धरणभागातील रिंगरोड, धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बु., निवंगण, धानवली, शिरवली हि.मा., चौधरीवस्ती, कुडली खुर्द, कुडली बु., दुर्गाडी तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाई वस्ती, सुईरमाळ, कारुंगण यासह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरु झाली आहे.
> एक किलोमीटरवरुन आणावे लागते पाणी
वेल्हे तालुक्यातील बारा मावळ परिसरातील गुंजवणे येथील दरडिगेवस्ती येथील ग्रामस्थांना एक किलोमीटरवरून खोल दरीतून पाणी आणावे लागत आहे. लव्ही येथील ग्रामस्थांनादेखील तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेची विहीर नदीपात्रात आहे. परंतु, नदीतच पाणी नसल्याने विहिरीला पाणी नाही, तीन-चार दिवसांतून एकदा नळाला पाणी सोडले जाते, अशी माहिती पोलीस पाटील तानाजी रेणुसे व उपसरपंच अशोक रेणुसे यांनी दिली आहे.
याबाबत टँकरचा प्रस्ताव २० दिवसांपूर्वी पंचायत समितीकडे पाठविला आहे, परंतु अद्यापही या गावात टँकर सुरू झाला नाही. या परिसरातील सणसवाडी, देवपाल, चराटवाडी, वाजेघर गावांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील विविध गावातील पाणीपुरवठा योजना या नदीवरील पाण्यावर अवलंबून आहेत. तर या गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याविना जनावरांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.गुंजवणी धरण उशाला असले तरी, या धरणावरून कोणतीही योजना न झाल्याने गावा-गावांत पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.