9 arrested in hawala racket case | हवाला रॅकेट प्रकरणी ९ जणांना अटक

हवाला रॅकेट प्रकरणी ९ जणांना अटक

पुणे : गुटखा विक्रीच्या पैशातील हवाला रॅकेटप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने बुधवारी रात्री ५ ठिकाणी छापे घालून ९ जणांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ४७ लाख ३८ हजार रुपयांची रोकड व इतर साहित्य जप्त केले आहे.

हितेश माणिकलाल गज्जर (वय ४८, रा. गंगाधाम, कोंढवा), अविनाश कांतीलाल व्यास (४७, रा. बुधवार पेठ), राहुलकुमार महेंद्रभाई पटेल (३८, रा. शुक्रवार पेठ), जिग्नेश नटवरलाल पटेल (४६, रा. गुरुदेव अपार्टमेंट, शुक्रवार पेठ), जयेश मुन्नाभाई दवे (४६, रा. मंत्री किशोर बिल्डिंग, बुधवार पेठ), विपुल सतीश पटेल (३८, रा. मंत्री किशोर बिल्डिंग, बुधवार पेठ), गजेंद्र रामभाई पटेल (४७, रा. शनिवार पेठ) आणि किरणसिंग हिमतुली चौहान (२९, रा. बुधवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, न्यायालयात हजर करण्यात आलेल्या नऊ जणांना जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रवीण भागुजी कराळे (३८) यांनी फिर्याद दिली आहे.

बुधवार पेठ व शनिवार पेठेतील मंत्री किशोर आर्केड येथील ३ कार्यालये, शनिवार पेठेतील गणेश कृपा पेपर गल्ली या पाच ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना माहिती मिळाली, की खराडीत सुरेश अगरवाल (५४, रा. खराडी) हा कस्टम ड्युटी चुकवून पानमसाला, गुटखा, परदेशी बनावटीच्या सिगारेटची विक्री करत आहे. त्यानुसार अगरवाल याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नवनाथ नामदेव काळभोर गुटखा पुरवत असल्याची कबुली दिली होती.

गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत गुटख्याचे मुख्य दोन विक्रेते असून हवाला मार्फत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पथके तयार करण्यात आली होती. बुधवारी सकाळी ७ वाजता ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या ठिकाणी ३ कोटी ४७ लाखांची रोकड, ९ मोबाईल, २ डीव्हीआर, २ पैसे मोजण्याचे मशीन असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

----------------------------------

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 9 arrested in hawala racket case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.