पालिकेत ९८ कोटींच्या जुन्या नोटा
By Admin | Updated: November 16, 2016 03:30 IST2016-11-16T03:30:28+5:302016-11-16T03:30:28+5:30
१ हजार व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीत ११ नोव्हेंबरपासून ९७ कोटी ५० लाख रुपयांच्या जुन्या

पालिकेत ९८ कोटींच्या जुन्या नोटा
पुणे : १ हजार व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीत ११ नोव्हेंबरपासून ९७ कोटी ५० लाख रुपयांच्या जुन्या नोटांची भर पडली आहे. मंगळवारी एका दिवसात पालिकेकडे रात्री ९ वाजेपर्यंत १९ कोटी ५० लाख रुपये जमा झाले.
दरम्यान, पालिकेने केंद्र सरकारच्या जुन्या नोटांची मुदत वाढविण्यात स्वत:च्या अभय योजनेलाही मुदतवाढ दिली आहे. थकबाकीदारांना कर जमा केल्यास त्यांना दंडाच्या रकमेत ७५ टक्के मुदतवाढ देण्याची अभय योजना पालिकेने जाहीर केली होती. त्याची मुदत आतापर्यंत पालिकेने २ वेळा वाढविली. आता जुन्या नोटांच्या मुदतवाढीत पालिकेने अभय योजनेलाही मुदतवाढ दिली आहे.
त्यासाठी आयुक्त कुणाल कुमार यांनी संमती दिली. आचारसंहितेमुळे सध्या पदाधिकारी कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. एरवी अशा प्रकारची मुदतवाढ देण्यासाठी प्रशासनाला स्थायी समिती, सर्वसाधारण समितीपुढे विषय आणणे बंधनकार झाले असते. मात्र, आता आयुक्तांनी स्वत:च्या स्तरावर निर्णय घेतला व अभय योजनेला मुदतवाढ दिली.
गेले आठ दिवस मिळकतकर विभागाचे सर्व कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. या विभागातील शिपायांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी एकजूट दाखवून काम केल्यामुळेच कसलाही गोंधळ न होता कामकाज पार पडते आहे, असे उपायुक्त मापारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)