चाकण नगरपालिकेसाठी ८५ टक्के मतदान
By Admin | Updated: November 2, 2015 01:00 IST2015-11-02T01:00:52+5:302015-11-02T01:00:52+5:30
ग्रामपंचायतीचे गेल्या सहा महिन्यांपूर्वी नगर परिषदेत रूपांतर झालेल्या चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी येथे प्रथमच शांततेत व उत्साही वातावरणात मतदानप्रक्रिया पार पडली.

चाकण नगरपालिकेसाठी ८५ टक्के मतदान
चाकण : ग्रामपंचायतीचे गेल्या सहा महिन्यांपूर्वी नगर परिषदेत रूपांतर झालेल्या चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी येथे प्रथमच शांततेत व उत्साही वातावरणात मतदानप्रक्रिया पार पडली. एकूण २२ प्रभागांत ८५ टक्के मतदान झाले. १७ हजार ६०१ पैकी १५ हजार १०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि.२ ) मतमोजणी होणार आहे.
२२ मतदान केंद्रांवर सुमारे दीडशे अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते, अशी माहिती खेडचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मतराव खराडे व सहायक निवडणूक अधिकारी अशोक साबळे यांनी दिली.
सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. या निवडणुकीसाठी महिला, तरुणींची विशेष उपस्थिती होती. किरकोळ प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजयकुमार पाटील व चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
निवडणूक निरीक्षक तानाजी शिंदे, मुख्य निवडणूक निर्णय आधिकारी हिंमत खराडे यांनी मतदान केंद्रांना भेट दिली.
खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते, जालिंदर कामठे, राम गावडे आदी नेते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
जुन्नर : संपूर्ण शहरासह तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतलेल्या जुन्नर नगर परिषद प्रभाग क्रमांक २ व प्रभाग क्रमांक ४ च्या पोटनिवडणुकीत एकूण ४८.५९ टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेने मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
आज (सोमवारी )मतमोजणी होणार असून, राष्ट्रवादी कॉँंग्रेसच्या वृषाली सोमनाथ काजळे, परवीन बानो अब्दुल हमीद मोमीन, शिवसेनेच्या सुवर्णा अमोल बनकर, माया श्यामसिंह खोत, भारतीय जनता पक्षाच्या कविता संचित गुंजाळ यांच्यापैकी मतदारांनी कोणाला कौल दिला, हे समजणार आहे. सकाळपासून मातब्बर नेतेमंडळीनी केंद्रावर तळ ठोकला होता.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व अपक्ष अशी चौरंगी लढत झाली. कोण निवडून येणार याचा अंदाज लावताना लोक चावडीवर गप्पा मारताना दिसत होते. कचरा समस्या, वाहतूककोंडी, रस्ते, पाणी, महामार्गावरील उड्डाण पूल आदी प्रश्न प्रचाराचे मुद्दे म्हणून प्रचारात चांगलेच गाजले. राष्ट्रवादीने खासदारा सुप्रिया सुळे, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, तर शिवसेनेने जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या जाहीर सभा घेतल्या. तर भाजपाने कोणत्याही नेत्याला पाचारण केले नाही.
चाकण नगर परिषदेची निवडणूक अटीतटीने पार पडली असून, गावातील दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. त्यात ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी पद भूषविलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर, उद्योजक, शिक्षक आदींचा समावेश आहे. ग्रामपंचायतीमध्ये काम केलेल्या कारभाऱ्यांना जनता पुन्हा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज मतमोजणी असून चाकण नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरूझाली आहे.