कुकडी प्रकल्पातील धरणात ८१.१५ टक्के पाणी
By Admin | Updated: September 25, 2016 04:51 IST2016-09-25T04:51:15+5:302016-09-25T04:51:15+5:30
जिल्ह्याबरोबर अहमदनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांतील तहान भागविणाऱ्या कुकडी प्रकल्पात ८१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात अवघा ४९.२२ टक्के

कुकडी प्रकल्पातील धरणात ८१.१५ टक्के पाणी
घोडेगाव : जिल्ह्याबरोबर अहमदनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांतील तहान भागविणाऱ्या कुकडी प्रकल्पात ८१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात अवघा ४९.२२ टक्के पाणीसाठा होता. या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे थोडीफार कमी झालेली पाण्याची पातळी भरून निघाल्याने या वर्षी आशादायी वातावरण आहे.
कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नूर यांच्याशी सध्याचा पाणीसाठा व नियोजन याबाबत चर्चा केली असता, कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये चांगला पाऊस पडत असल्याने धरणात उत्तम साठा झाला आहे. मात्र, कुकडी प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या पूर्व भागात अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. येथील तलाव अजूनही भरलेले नाहीत. याच पूर्व भागात पाण्याची मागणी सर्वांत जास्त असते. त्यामुळे कुकडी प्रकल्प जरी भरलेला असला, तरी मागणीही विस्तृत आहे. याचा पाण्यावर ताण येणार आहे. मागील वर्षी ५० टक्के पाणीसाठा असताना चांगले नियोजन करून लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. त्याप्रमाणे याही वर्षी उत्तम नियोजन करून शेवटच्या माणसापर्यंत पाणी देण्याचे नियोजन आम्ही करणार आहोत. या वर्षी सर्वांत मोठे आव्हान हे नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्याचे आहे. मागील तीन ते चार वर्षांचा विचार करता आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये परतीचे मोठे पाउस पडले आहेत. (वार्ताहर)
- कुकडी प्रकल्पातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या डिंभे धरणात १०० टक्के, तर जुन्नर तालुक्यातील वडज धरणात ९९.४२ टक्के, पिंपळगाव जोगा धरणात ८२.६० टक्के, माणिकडोह धरणात ७०.२३ टक्के साठा झाला आहे. तर, यडगाव साठवण धरणात २५.३० टक्के पाणी आहे. तसेच, शिरूर तालुक्यातील घोड धरणात ९६.६७ टक्के, चिल्हेवाडी धरणात ७१.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.