लोणावळ्यात ८ तास मिरवणूक
By Admin | Updated: September 10, 2014 00:50 IST2014-09-10T00:50:20+5:302014-09-10T00:50:20+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद सर्व नागरिकांना घेता यावा, याकरिता मिरवणूक लवकर सुरु करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या.

लोणावळ्यात ८ तास मिरवणूक
लोणावळा : गणपती बाप्पा मोरया़़़ मंगलमुर्ती मोरया़़़ पुढच्या वर्षी लवकर या़ चा जयघोष ढोल लेझिम -ताशाच्या निनाद आणि डिजेचा आवाज व कार्यकर्त्यांचा उत्साह या मंगलमय वातावरणात शहरातगणरायाला भावपुर्ण निरोप देण्यात आला़ येथे आठ तास गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरु होती़
गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद सर्व नागरिकांना घेता यावा, याकरिता मिरवणूक लवकर सुरु करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र कार्यकर्त्यांचा उत्साहामुळे या मिरवणुका दरवर्षीप्रमाणचे सायंकाळी ४ वाजता सुरु झाल्या़ पाच वाजता मानाचा पहिला रायवुड गणेश उत्सव मंडळाचा गणपती मावळा पुतळा चौकात दाखल झाला़ मानाचा दुसरा तरुण मराठा मित्र मंडळ, रोहिदास तरुण मंडळ, शेतकरी भजनी मंडळ व गवळीवाडा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे मानाचे पाच गणपती रांगेत मिरवणुकीसाठी दाखल झाले़ प्रत्येक गणेश मंडळांसमोर ढोल- लेझिम पथकांचे खेळ सुरु होते़ मंगलमय वातावरणात मिरवणुका सुरु झाला. सकाळपासून कोसळणाऱ्या वरुणराजाने विश्रांती घेतल्याने मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ गणेश भक्तांच्या स्वागतासाठी रामदेवबाबा भक्त मंडळाच्या वतीने भेळ, तर लायन्स क्लब लोणावळा-खंडाळाच्या वतीने चहाचे वाटप करण्यात आले़ जयचंद चौकात लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने भाविकांसाठी ३ हजार किलोचा महाप्रसाद बनविला होता़ लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक आय़एस़पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे व शिक्षण मंडळाचे माजी सभापती बाळासाहेब फ ाटक यांच्या हस्ते ह्या महाप्रसादाचे वाटप करत उद्घाटन करण्यात आले़ शिवाजी चौकात लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा नगरपरिषद, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा लोणावळा मंडळ, भाजपा महिला आघाडी, मनसे, स्वभिमानी रिपब्लिकन पार्टी व स्वाभिमान संघटना यांनी स्वागत कक्ष उभारले होते़ नगराध्यक्ष अमित गवळी, उपनगराध्यक्ष शंकूतला इंगूळकर, कॉग्रेस आयचे जिल्हा सरचिटणीस किरण गायकवाड, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माऊली दाभाडे, कॉग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, रवींंद्र भेगडे, सुरेखा जाधव, शोभा दळवी, दादा धुमाळ, शौकत शेख, रमेश म्हाळसकर, अंकुश चव्हाण आदींनी या वेळी गणेश मंडळाचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला़
उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव कलुबर्मे व
पोलीस निरीक्षक आय़ एस़ पाटील यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.(वार्ताहर)