१२८ जागांसाठी ७५८ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: February 8, 2017 03:20 IST2017-02-08T03:20:18+5:302017-02-08T03:20:18+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १२८ जागांसाठी १२३८ उमेदवारांपैकी ४८० जणांनी माघार घेतली असून, ७५८ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

१२८ जागांसाठी ७५८ उमेदवार रिंगणात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १२८ जागांसाठी १२३८ उमेदवारांपैकी ४८० जणांनी माघार घेतली असून, ७५८ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आज शेवटची होती. महापालिका कार्यक्षेत्रातील अकरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज माघारीसाठी दुपारी तीनपर्यंत वेळ होती. त्यामुळे उमेदवारी माघारीसाठी मोठयाप्रमाणावर गर्दी झाली होती.
काँग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांतील नाराजांना थंड करण्यातही नेत्यांनी प्रयत्न केले. एकुण पाच हजार अर्जांपैकी छाननीत १२३८ अर्ज वैध ठरले होते. सोमवारपासून माघारीची मुदत होती. पहिल्या दिवशी ५६ जणांनी माघार घेतली. मंगळवारी सकाळपासूनच माघारीसाठी गर्दी दिसून येत होती. दुपारी तीनपर्यंत महापालिकेच्या ११ निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात माघारीचे अर्ज आणून दिले जात होते. हे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १२८ जागांसाठी १२३८ उमेदवारांपैकी आज चारशे चोविस जणांनी माघार घेतली तर काल ५६ जणांनी माघार घेतली. आजपर्यंत एकुण ४८० जणांनी माघार घेतली असून ७५८ उमेदवार रिंगणात राहणार आहेत.
महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चिन्ह वाटप बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून होणार आहे. तसेच उद्या मतदानकेंद्रानुसार मतदार यादीही जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून प्रभाग निहाय उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.(प्रतिनिधी)