पुणे : उरवडेमध्ये केमिकल कंपनीत लागलेली आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे कर्मचारी गेले अनेक तास झुंजत आहेत. पुण्यातील पुणे महानगर प्राधिकरणाच्या फायर ब्रिगेडचे जवळपास ७० कर्मचारी घटनास्थळी आग विझवण्यासाठी पोचले होते. गेले अनेक तास शर्थीचे प्रयत्न करत आग विझवून त्यांनी १८ मृतदेह बाहेर काढले आहेत. आता पुन्हा भडका उडू नये म्हणून कुलिंगचं काम सुरू झालं आहे. पण ही आग नेमकी लागली कशी याविषयी लोकमतशी बोलताना पीएमआरडीएचे अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे म्हणाले, “साधारण चार वाजता आग लागली असल्याचा कॉल आला. इथे आलो तेव्हा सुरुवातीला काही दिसत नव्हते. त्यामुळे अंदाज घेणे अवघड झाले होते. धुरामुळे दार पण दिसत नव्हते. त्यामुळे आल्या आल्या आम्ही जेसीबीनी भिंती पडल्या."
कंपनीकडून ३७ लोकांची यादी दिली आणि १७ जण सापडत नसल्याचं फायर ब्रिगेडचा अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांना सापडले ते मात्र या १७ जणांचे मृतदेहच. पोटफोडे यांच्या मते मृतदेहांची अवस्था अशी होती की त्यांचा शरीराचा अक्षरश: कोळसा झाला होता.
आगीचे कारण स्पष्ट करताना पोटफोडे म्हणाले, हे केमिकल आग लागणारे नाहीत. पण ते केमिकल प्लॅस्टिकमध्ये पॅक करत असताना स्पार्क उडून आग लागली. महिला खाली बसून काम करत होत्या. त्यांना कळलंच नाही. आणि पळून जाण्याची संधी मिळाली नाही. श्वास घ्यायला त्रास झाल्याने लोकांना बाहेर पडता आलं नाही."