मध्यम वयोगटात गुडघेदुखीच्या तक्रारींमध्ये ७० टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:16+5:302020-12-08T04:11:16+5:30
पुणे : कोरोना लॉकडाऊनने नागरिक पूर्ण वेळ घरी होते. त्याची परिणती आता विविध आजारांमध्ये होताना दिसत आहे. मध्यम वयोगटातील ...

मध्यम वयोगटात गुडघेदुखीच्या तक्रारींमध्ये ७० टक्क्यांनी वाढ
पुणे : कोरोना लॉकडाऊनने नागरिक पूर्ण वेळ घरी होते. त्याची परिणती आता विविध आजारांमध्ये होताना दिसत आहे. मध्यम वयोगटातील लोकांमध्ये गुडघेदुखीच्या तक्रारी वाढल्याचे डॉक्टरांचे निरिक्षण आहे.
अनेक महिने घरी राहिल्यानंतर पुन्हा व्यायामाला सुरुवात, वाढत्या शारीरीक हालचाली यामुळे गुडघ्यांवर ताण येत आहे. थंड हवामानामुळेही गुडघेदुखीचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊन दरम्यान हालचालींचा वेग मंदावल्याने ४० ते ६० वयोगटातील जवळपास ७० टक्के लोकांना गुडघेदुखीची तक्रार जाणवत आहे.
लॉकडाऊनमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा अतिवापर, बैठी जीवनशैली, वर्क फ्रॉम होम दरम्यान बसण्याच्या चुकीच्या सवयी याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. घरात राहिल्याने पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाली आहे. बैठी जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे बऱ्याच लोकांचे वजन वाढले आहे. चुकीच्या पध्दतीने व्यायाम केल्याने गुडघ्यावर अतिरिक्त भार येत असल्याने वेदना होत असल्याचेही दिसून येते.
अनलॉकनंतर गुडघेदुखीची तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याचे दिसून येते. उपचारासाठी येणाऱ्या १० पैकी ८ रुग्णांना गुडघेदुखी असल्याचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. आनंद जाधव यांनी सांगितले. गुडघेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
चौकट
काय काळजी घ्यावी?
* आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध, फळे, बीट, सोयाबीन यांचा समावेश असावा.
* निरोगी आहार आणि व्यायामामुळे हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत राहतात.
* दररोज किमान २० मिनिटे सूर्यप्रकाश मिळवा.
* ‘जॉइंट रिप्लेसमेंट’ हा शेवटचा पर्याय, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.
चौकट
गुडघेदुखी कोणत्याही वयात होऊ शकते. सांधेदुखी असल्यास सांध्यामध्ये दाह निर्माण होऊन सांधे खराब होतात व व्यंग निर्माण होऊन कायमचे निकामी होऊ शकतात. या आजाराकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ रिमेटोलॉजीच्या निकषानुसार विशिष्ट लक्षणे आणि प्रयोगशाळेतील काही चाचण्यांच्या निष्कर्षांवर बदलांवर संधिवातात होणाऱ्या बदलाची पाहणी केली जाते.
- डॉ. संजय इंगळे, अस्थीरोगतज्ज्ञ