६७ पैसे टक्केवारीचा निकष रद्द
By Admin | Updated: October 30, 2015 00:08 IST2015-10-30T00:08:09+5:302015-10-30T00:08:09+5:30
पिकांच्या नुकसानीबाबत ५० पैशांच्या आतील व खालील टक्केवारी असलेली गावे ७६ गावे पात्र असून, ६७ पैसे टक्केवारीचा निकष शासनाने रद्द केला आहे

६७ पैसे टक्केवारीचा निकष रद्द
पुणे : पिकांच्या नुकसानीबाबत ५० पैशांच्या आतील व खालील टक्केवारी असलेली गावे ७६ गावे पात्र असून, ६७ पैसे टक्केवारीचा निकष शासनाने रद्द केला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी आज ‘लोकमत’ला दिली.
पुणे जिल्ह्यातील दुष्काळी गावांच्या संख्येविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळ जाहीर करताना पैसेवारीत पंधरा टक्क्यांनी वाढ केली जाणार असल्याची घोषणा केली. ५० ते ६७ पैसे टक्केवारी असलेल्या गावांमध्येच शासन दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती पुढे आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यातच ७६ गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला. हा दुष्काळ ५० ते ६७ पैसे टक्केवारी असलेल्या गावांमध्ये असल्याचा समज निर्माण झाला. पुणे जिल्ह्यातील दहाच गावे दुष्काळग्रस्त ठरणार असल्याची भीती व्यक्त होऊ लागली.
आपले गाव किंवा क्षेत्र ५० पैशांच्या आत व पुढे असल्याचे ज्यांना माहिती आहे, अशा शेतकऱ्यांनी पैसेवारीचा निकष पूर्वीप्रमाणे अमलात आणावा, अशी मागणी सुरू केली आहे. जगताप म्हणाले, की ६७ पैसे टक्केवारीचा निकष शासनाने बदलला आहे. त्यामुळे ७६ गावांमध्ये जाहीर केलेला दुष्काळ योग्य आहे. गावांच्या संख्येत पीक कापणी प्रयोगानंतर अत्यल्प वाढ किंवा घट होऊ शकेल. (प्रतिनिधी)