६० हजारांवर मराठ्यांची उपस्थिती
By Admin | Updated: September 26, 2016 01:33 IST2016-09-26T01:33:03+5:302016-09-26T01:33:03+5:30
पुण्यातील मराठा मूक मोर्चासाठी सुमारे ६० हजारांपेक्षा मराठ्यांची उपस्थिती असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. मोर्चात जास्तीत जास्त पुरंदर तालुक्याचा सहभाग

६० हजारांवर मराठ्यांची उपस्थिती
जेजुरी : पुण्यातील मराठा मूक मोर्चासाठी सुमारे ६० हजारांपेक्षा मराठ्यांची उपस्थिती असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. मोर्चात जास्तीत जास्त पुरंदर तालुक्याचा सहभाग राहावा म्हणून तालुक्यातील संयोजक गेले १५ दिवसांपासून नियोजन करीत होते.
सासवड, जेजुरी या प्रमुख शहराव्यातिरिक्त गावागावांतून
मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्याला गावागावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळत होता. तालुक्यातील
अनेक मराठा समाजबांधवांनी कालपासूनच पुण्यात जायला सुरुवात केली होती.
आज सकाळी ६ वाजतापासून जेजुरी-सासवड येथून मराठाबांधव पुण्याकडे कूच करीत होते. सासवड येथून मोर्चात सहभागी
होणाऱ्या मराठाबांधवांसाठी संयोजकांनी ४० एसटी बस, ३० पीएमटी बस, २५ खासगी बस, १० ट्रक, ४०० जीपगाड्या आणि
सुमारे ८००० दुचाकींच्या अधिकृत नोंदी केलेल्या होत्या. याशिवाय तालुक्यातील प्रत्येक गावातून उत्स्फूर्तपणे मराठाबांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी गेला होता.
पुरंदर तालुक्यातील समाजबांधवांसाठी पुण्यातील गुलटेकडी, मार्केट यार्ड परिसरात वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
पुरंदरकरांनी हा संपूर्ण परिसर व्यापून टाकला होता.
तालुक्यतील शाळा-महाविद्यालयांतील युवक-युवतींची मोठी संख्या दिसत होती. मोर्चाचा प्रारंभ करण्यासाठी डेक्कन येथील संभाजीमहाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालणे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
देण्यासाठी जिल्ह्यातून १५
भगिनींची निवड केली होती.
इंदापूरमधून ८० बस; दोन हजार चारचाकी
इंदापूर : पुणे शहरात झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी इंदापूर तालुक्यातून सुमारे ७० हजार जण गेले होते. एसटी बसने जाणाऱ्यांबरोबरच ८० बस आणि दोन हजार चारचाकी वाहनांतून लोक मोर्चाला गेले होते, अशी माहिती तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.ते म्हणाले, की राजकीय पक्ष, संघटना, आपसातील मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सर्व जण एकत्र आले होते. तालुक्यातील प्रत्येक गावातून किमान दहा गाड्या निघाल्या होत्या. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यावरून ४० हजार गाड्या गेल्याची नोंद आहे. मराठा समाजाच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक नागरिक मोर्चात सामील झाले होते.