राजगुरुनगर बँकेसाठी ६० टक्के मतदान
By Admin | Updated: May 18, 2015 05:32 IST2015-05-18T05:32:41+5:302015-05-18T05:32:41+5:30
उत्तर पुणे जिल्ह्यात नावारूपाला आलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेसाठी आज १७ संचालक निवडून देण्यासाठी ४१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले

राजगुरुनगर बँकेसाठी ६० टक्के मतदान
दावडी : उत्तर पुणे जिल्ह्यात नावारूपाला आलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेसाठी आज १७ संचालक निवडून देण्यासाठी ४१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सरासरी ६०़३४ टक्के मतदान झाले आहे़ असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे यांनी दिली. उद्या सोमवारी १८ रोजी राजगुरुनगर येथे रिद्धी सिद्दी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या एकूण १७ जागांसाठी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. बँकेच्या एकूण १९ हजार ७८५ मतदारांपैकी ११ हजार ९३९ मतदार सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.
बँकेच्या कार्यक्षेत्रात पुणे, भोसरी, म्हाळुंगे, चाकण, राजगुरुनगर, कडूस, आळेफाटा, नारायणगाव, देहूरोड, मंचर, आळंदी, शिरूर या ठिकाणी मतदान घेण्यात आले. चाकण आणि राजगुरुनगर या दोन केंद्रावर जास्त सभासद मतदार असल्याने येथे मतदान केंद्रांची संख्या जास्त होती. मतदारांनी सकाळपासून मतदान करण्यासाठी गर्दीकेली होती. मतदानासाठी ज्या शाखेचे सभासद आहेत, त्याच शाखेच्या नजीक असलेल्या केंद्रांवर मतदान करण्याची सोय केल्याने बाहेरगावच्या सभासद मतदारांचे हाल झाले.
बँकेने यावेळी सभासद क्रमांकानुसार मतदान प्रक्रिया न घेता अनुक्रमांकानुसार घेतल्याने मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना धावपळ करावी लागली. बँकेचे अनेक मतदार हे कामगार असल्याने ते मतदानासाठी येण्यास मोठा उशीर लागला. मतदानाची वेळ सकाळी ८ ते ५ अशी असताना उमेदवारांनी प्रचार करताना ही वेळ सात ते साडेपाच सांगितल्याने अनेक कामगार मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. राजगुरुनगर व चाकण केंद्रावर दुपारी ४ ते ५ या कालावधीत जास्त कामगार सभासद मतदानासाठी आले होते.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीतील १७ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १७ विद्यमान संचालकांचा समावेश आहे. या निवडणुकीत सहकार आणि भीमाशंकर ही दोन पॅनेल उभी करण्यात आली होती.
भीमाशंकर पॅनेलमध्ये ११ उमेदवार होते तर इतर उमेदवारांनी स्वबळावर निवडणूक लढविली आहे. एकंदरीत निवडणूक शांततेत होण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. सर्वांत जास्त गर्दी राजगुरुनगर केंद्रावर होती. उद्या सोमवारी राजगुरुनगर येथे मतमोजणी होणार आहे. (वार्ताहर)