शिक्षा भोगणारे ५९३ खुनी, बलात्कारी तुरुंगातून फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:30+5:302021-07-15T04:09:30+5:30
कैदी उडाले : पळालेल्यांमध्ये जन्मठेप भोगणारे जास्त विवेक भुसे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ...

शिक्षा भोगणारे ५९३ खुनी, बलात्कारी तुरुंगातून फरार
कैदी उडाले : पळालेल्यांमध्ये जन्मठेप भोगणारे जास्त
विवेक भुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा काही काळ भोगल्यानंतर, मिळालेल्या रजेची मुदत पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातील कारागृहात ५९३ कैदी पुन्हा परतलेच नाही. शिक्षा झालेली असताना आजही ते मोकाट फिरत आहेत.
राज्यातील कारागृहातून संचित रजेवर गेलेले ३३१ कैदी आणि अभिवचन रजेवर गेलेले २६२ कैदी शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा तुरुंगात परतलेच नाहीत. त्यांच्या शोधासाठी कारागृह विभागाने वारंवार नोटिसा काढल्या. हे कैदी राहात असलेल्या हद्दीतील पोलीस तसेच तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. तरीही तपास न झाल्याने असे बहुतांश कैदी फरार आहेत.
न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर कैद्याला कारागृहात पाठविले जाते. कारागृहात काही काळ शिक्षा भोगल्यानंतर त्याला महत्त्वाच्या कारणासाठी रजा मिळू शकते. त्यात संचित रजा कारागृह प्रशासन मंजूर करते. तर अभिवचन रजा जिल्हाधिकारी स्तरावर मंजूर केली जाते. रजेचा कालावधी संपल्यानंतर कैद्याने उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात परत येणे अपेक्षित असते. मात्र, अनेक कैदी हे पुन्हा कारागृहात परतत नसल्याचे निदर्शनास आले.
अशा कैद्यांना कारागृह फरार घोषित करून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाला सांगण्यात आले. कारागृह प्रशासनाने आजवर फरार असलेल्या कैद्यांची यादी नुकतीच तयार केली. त्यात ५९३ कैद्यांचा समावेश आहे. अगदी १९९५ पासून फरार कैद्यांचाही या यादीत समावेश आहे. फरार झालेले बहुतांश कैदी हे खून तसेच बलात्काराच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेले आहेत.
चौकट
फरारी कैद्यांची गंभीर उदाहरणे
-खून प्रकरणात एकाला १९८६ साली जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याला १९९५ मध्ये रजा मिळाली. रजेवर गेल्यानंतर उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तो परत आलाच नाही.
-नागपुरातील एकाला खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली. डिसेंबर १९९७ मध्ये तो १५ दिवसांच्या रजेवर गेला तो परतच आला नाही. त्याची पत्नीच जामीनदार होती. तिच्याविरुद्ध कार्यवाहीचे पत्र संबंधित तहसीलदारांना पाठविले. मात्र, काय कार्यवाही झाली याची माहिती नाही.
-एकाला खून प्रकरणात १९८३ मध्ये जन्मठेप झाली. त्याला नोव्हेंबर १९८७ मध्ये पॅरोल रजा मिळाली. त्यानंतर तो फरारी झाला.
-निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खून प्रकरणात मोका न्यायालयाने एकाला जन्मठेपेची शिक्षा २००३ मध्ये सुनावली. संचित रजेनंतर तो सप्टेंबर २००८ पासून फरार आहे.
चौकट
कारागृह फरार कैद्यांची संख्या
नागपूर ११६
अमरावती १२६
मोर्शी खुले १
येरवडा १०५
कोल्हापूर ४४
येरवडा खुले २
औरंगाबाद ६१
नाशिक रोड ११३
पैठण खुले १७
धुळे २
मुंबई ३
ठाणे २
रत्नागिरी २
गडचिरोली १
चौकट
फरार सापडण्याची शक्यता दुरापास्त
अनेक कैदी हे २० ते २५ वर्षांपासून फरार आहेत. आता त्यांच्यामध्ये खूप बदलही झाला असण्याची शक्यता आहे. कारागृहाकडे बहुतांश कैद्यांचे फोटो उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेणेही अवघड आहे. त्यातील काही जण काळाच्या ओघात या जगातही नसण्याची शक्यता आहे.