पश्चिम रिंगरोडचे ५१ टक्के मोजणीचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:32+5:302021-06-21T04:08:32+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने पुणे जिल्ह्यातील रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. पश्चिम भागातील ...

पश्चिम रिंगरोडचे ५१ टक्के मोजणीचे काम पूर्ण
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने पुणे जिल्ह्यातील रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. पश्चिम भागातील रिंगरोडचे ५१ टक्के काम पूर्ण झाले आहे. २२ गावांतील ३५१ हेक्टर जमिनीची मोजणी करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपअभियंता संदीप पाटील यांनी दिली.
एमएसआरडीसी आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून संयुक्त मोजणीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील भूसंपादन अर्धे झाले आहे. लवकरच उर्वरित भूसंपादन पूर्ण करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात १७ गावांतील ४० टक्के मोजणी झाली होती. त्यामुळे आतापर्यंत एकूण २२ गावांतील ५१ टक्के मोजणी पूर्ण झाली असून लवकरच उर्वरित गावातील मोजणीचे काम करण्यात येणार आहे.
-----
या २२ गावांतील मोजणी पूर्ण
पश्चिम भागातील रिंगरोडसाठी रांजे, कुसगव, मोरदरवाडी, घेरा सिंहगड, खामगाव मावळ, वरदाडे, मालखेड, मांडवी बुद्रुक, सांगरून, कातवडी, आंबेगाव, उरावडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, मातेरेवाडी, घोटावडे, रिहे, पडळघरवाडी, जावळ, खेमसेवाडी आणि पिंपलोळी या २२ गावांतील ३५१ हेक्टर मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित १६ गावातील ३४४ हेक्टर जमीन मोजणी लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
रिंगरोडसाठी शासन शेतकऱ्यांना मोबदला चांगला देत आहे. त्यामुळे अनेक गावातील शेतकरी भूसंपादनाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे मागील महिन्याभरात २२ गावांतील मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित गावातील मोजणी देखील शेतकऱ्यांच्या सहकार्याने वेगाने करणार आहे.
- संदीप पाटील, उपअभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
----
पॉइंटर्स
* एमएसआरडीसीच्या रिंगरोडची एकूण लांबी :- १७३ किलोमीटर
* रिंगरोडसाठी लागणारी एकूण जमीन :- १५७५ हेक्टर
* रिंगरोड उभारणीचा एकूण खर्च :- १७ हजार कोटी रुपये
* रिंगरोडसाठी आतापर्यंत भूसंपादन झालेली एकूण गावे :- २२ गावे
* भूसंपादनाची आतापर्यंत एकूण टक्केवारी :- ५१ टक्के