पिंपरी : मोबाइल खरेदी केला तो आठ दिवसांत नादुरुस्त झाला. कंपनीने मोबाइलचे पैसे परत देण्याचे मान्य केले. मात्र, १८ महिने उलटून गेल्यानंतरही कंपनीने पैसे परत न केल्याने ग्राहक मंचात तक्रार दाखल झाली. ग्राहक मंचाने या दाव्याचा निकाल देताना तक्रारदार ग्राहकास मोबाइलची किंमत परत द्यावी. तसेच भरपाई म्हणून पाच हजार आणि तक्रारीचा खर्च दोन हजार रुपये द्यावा, असे म्हटले आहे. पुण्यातील ग्राहक मंचात पिंपरी-चिंचवडमधील एका ग्राहकाने नामांकित मोबाइल कंपनीच्या सेवेतील त्रुटीबाबत तक्रारअर्ज दाखल केला होता. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच पुणे येथे दाखल झालेल्या या दाव्याचा निकाल ७ मार्च २०१७ ला लागला. ग्राहक मंचाचे अध्यक्ष एम के वालचाळे, सदस्य एस. के. पाचारणे, शुभांगी दुनाखे यांनी हा ग्राहकाला भरपाई देण्याचा आदेश दिला. मोबाइल विक्री करणारा दुकानदार, कंपनीचे सेवा केंद्र आणि कंपनीचे व्यवस्थापक यांना या दाव्यात प्रतिवादी करण्यात आले होते. ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशात तक्रारदार ग्राहकास १२ हजार १०० रुपये दरसाल दर शेकडा सहा टक्के व्याजदराने द्यावी. झालेल्या त्रासासाठी तक्रारदारास पाच हजार रुपये द्यावेत. आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांत पूर्तता करावी अन्यथा मोबाइलच्या मूळ किमतीवर नऊ टक्के व्याज आकारले जाईल, असेही ग्राहक मंचाच्या आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
मोबाइल कंपनीला पाच हजारांचा दंड
By admin | Updated: March 29, 2017 02:13 IST