वालचंदनगरमध्ये ५०० लिटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST2021-09-19T04:11:17+5:302021-09-19T04:11:17+5:30
कोरोनाच्या लढ्यासाठी होणार उपयोग चिराग दोशी: ९३ ते ९६ टक्के शुद्ध ऑक्सिजन मिळणार वालचंदनगर : कोरोनावर मात करण्यासाठी ...

वालचंदनगरमध्ये ५०० लिटर
कोरोनाच्या लढ्यासाठी होणार उपयोग
चिराग दोशी: ९३ ते ९६ टक्के शुद्ध ऑक्सिजन मिळणार
वालचंदनगर : कोरोनावर मात करण्यासाठी व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील कंपनीने मेक इन इंडियाअंतर्गत प्रतिमिनीट ५०० लिटर मेडिकल ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाची टेक्नॉलॉजी विकसित केली आहे अशी माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी दिली.
भारतामध्ये कोरोनाच्या महाभयंकर अशा दोन लाटा येऊन गेल्या आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली. तसेच दुसऱ्या लाटेमध्ये भारतात ठिकठिकाणी ऑक्सिजनची टंचाई जाणवू लागल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला होता. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला होता. वालचंदनगर येथील कंपनी गेल्या ११२ वर्षापासून देश उभारणीच्या कामामध्ये मोलाचे योगदान देत आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये योगदान देण्यासाठी वालचंदनगर कंपनी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्नशील आहे. कंपनीने सॅनिटायझेशन टँक, व्हेटिंलेटरची उपकरणे व मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची यशस्वी निर्मिती केली आहे. मेडिकल ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी संरक्षण व संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) व पीएम केअर्सची मदत केली. वातावरणातील हवा घेऊन त्यापासून २५० लिटर प्रतिमिनीट व ५०० लिटर प्रतिमिनीट ऑक्सिजन निर्मिती बनविण्याची टेक्नॉलॉजी कंपनीने विकसित केली आहे.
आत्तापर्यंत २५० लिटर प्रतिमिनीट ऑक्सिजन निर्मितीचे दहा प्रकल्प नागालँड, त्रिपुरा, झारखंड व राजस्थान मधील हॉस्पिटल पीएम केअर्समधून देण्यात आले आहेत. देशातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प असावा यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कंपनी सध्या एरोस्पेस, मिसाईल, संरक्षण, अणुऊर्जा, पाणबुडीचे गुंतागुंतीचे गिअर बॉक्स निर्मिती करून देशउभारणीच्या कामामध्ये सातत्याने मदत करीत असून महाराष्ट्रात याची गरज भसल्यास सर्वतोपरी सहकार्य करणार असून, याबाबत आरोग्य मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे दोशी यांनी सांगितले. या वेळी जनरल मॅनेजर धीरज केसकर, एकनाथ पेठे उपस्थित होते.
वातावरणातील हवा घेऊन तयार होणार ऑक्सिजन...
वालचंदनगर कंपनीने तयार केलेल्या मेडिकल ऑक्सिजन प्रकल्पामध्ये वातावरणातील हवा कॉम्प्रेशरच्या साह्याने घेऊन त्यातील आद्रता काढली जाते. मशीनद्वारे केमिकलचा वापर करून शुद्ध ऑक्सिजन निर्मिती केला जातो. याचे प्रमाण ९३ ते ९६ टक्के असून याचा उपयोग रुग्णासाठी केला जातो. तसेच हा मेडिकल ऑक्सिजन टाक्यामध्ये साठवून ठेवता येतो.
---------------------
वालचंदनगर(ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीने तयार केलेला मेडिकल ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प.
१८०९२०२१-बारामती-१२