भीमाशंकर विकासासाठी५0 कोटी
By Admin | Updated: July 27, 2015 04:04 IST2015-07-27T04:04:39+5:302015-07-27T04:04:39+5:30
भीमाशंकर परिसर विकास आराखडा नव्याने तयार करण्यात आला असून यामध्ये दोन टप्प्यांत ५० कोटींची कामे समाविष्ट केली आहेत

भीमाशंकर विकासासाठी५0 कोटी
घोडेगाव : भीमाशंकर परिसर विकास आराखडा नव्याने तयार करण्यात आला असून यामध्ये दोन टप्प्यांत ५० कोटींची कामे समाविष्ट केली आहेत. या आराखड्यात विविध शासकीय विभागांनी समाविष्ट केलेल्या कामांची पाहणी व नव्याने काही कामे सुचविण्यासाठी भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील व खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी भीमाशंकर परिसराची पाहणी केली.
मार्च महिन्यात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये राज्यातील १५ देवस्थानला १२५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले होते.
यामध्ये भीमाशंकर देवस्थानचाही त्यांनी उल्लेख केला होता.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी भीमाशंकर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करण्याच्या
सूचना जिल्हा नियोजन विभागाला दिल्या. डीपीडीसीने सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत
वितरण कंपनी, वन्यजीव विभाग अशा सर्व विभागांची कामे समाविष्ट
करून दोन टप्प्यांत आराखडा तयार केला आहे.
हा आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून वित्तमंत्री यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक होऊन याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. शासनाकडे सादर करण्यापूर्वी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कामांची पाहणी करण्यात आली.
या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी पी. आर. केंभावी, देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त प्रशांत आवटे, खेडचे प्रांताधिकारी हिंमतराव खराडे, आंबेगावचे प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, जे. जी. विभूते, उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील, तहसीलदार बी. जी. गोरे, सहायक उपवनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, संतोषकुमार गिरीगोसावी,
विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खांडेकर,
देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त अॅड. सुरेश कौदरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)