दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाख लिटर पाणी
By Admin | Updated: April 4, 2016 01:34 IST2016-04-04T01:34:13+5:302016-04-04T01:34:13+5:30
च्या पुणे विभागातर्फे होत असलेल्या ‘जितो- कनेक्ट २०१६’ या आंतरराष्ट्रीय संमेलन व परिषदेनिमित्त दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मॅरेथॉन, ट्रेजर हंट कार रॅली

दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाख लिटर पाणी
बिबवेवाडी/पुणे : जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन) च्या पुणे विभागातर्फे होत असलेल्या ‘जितो- कनेक्ट २०१६’ या आंतरराष्ट्रीय संमेलन व परिषदेनिमित्त दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मॅरेथॉन, ट्रेजर हंट कार रॅली आणि बाईक रॅलीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यात हजारो पुणेकरांनी सहभाग घेतला. यातून दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल ५ लाख लिटर पाण्याची मदत होणार आहे, अशी माहिती जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.
महावीर जैन वसतिगृहाजवळून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. यामध्ये सुमारे १० हजार नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये जेवढे अंतर जितके लोक धावले त्याप्रमाणात प्रतिकिमी १० लिटर पाणी याप्रमाणे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना पाणी दिले जाणार आहे.
पाणी बचतीचे महत्त्व विशद करणारे फलक हातात घेऊन टी शर्ट परिधान केलेले नागरिक पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या या परिसरात आज सकाळी धावू लागले. मॅरेथॉनमध्ये पुण्यातील ५० ब्रँडेड बाईकर्स सहभागी झाले. त्यांनीही पाणी बचतीचा संदेश दिला.
रॅलीमध्ये सजावट केलेल्या २०० कार आणि त्यामध्ये १ हजार महिला सहभागी झाल्या होत्या. ही रॅली फक्त महिलांसाठी होती.
यामधून दुष्काळग्रस्तांना पाण्याची मदत करण्याबरोबरच पाणी बचत आणि पाणी वाचविण्यासंदर्भात जनजागृती करण्याचा उद्देश आहे, असे जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी सांगितले.
‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’, ‘जल ईश्वरा तुज्या ओंजळी’, ‘जल ईश्वर है’ आदी संदेश लिहिलेले फलक व चित्र कारवर लावले होते. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरण रक्षणार्थ सजविलेली वसुंधरा अशा विविध कल्पक चित्राकृती कारवर लावल्या होत्या.
रॅलीमध्ये सहभागी महिलांनी पुण्यातील २५ ऐतिहासिक व प्रसिद्ध ठिकाणी ठेवलेली वस्तू शोधून काढायची होती. त्यासाठी त्यांना संदर्भ देण्यात आला होता. जास्तीत जास्त वस्तू शोधणाऱ्यांबरोबरच जेवढे किलोमीटर अंतर त्यांनी कार
चालविली तेवढे प्रतिकिमी १० लिटरप्रमाणे दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यात आले.
राजेश साकला, विजयकांत कोठारी, शोभा धारिवाल, रंजना साकला, नरेंद्र छाजेड, अजित सेटिया, ओमप्रकाश रांका, चकोर गांधी, राजेश शहा, राहुल जैन, इंदर छाजेड, संयोजक सुजित भटेवरा, नगरसेविका मनीषा चोरबोले, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, ट्रेजर हंटच्या संयोजिका रिद्दी जैन, नेहा साकला, शर्मिला ओसवाल, रजनी भुरट, अनिता सरनोत, स्पर्धेच्या परीक्षक गीता गांधी-एथिराज, आएशा खान, कल्याणी उमराणी आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)