उद्योगपतीचे पाच लाख लंपास
By Admin | Updated: March 22, 2017 03:34 IST2017-03-22T03:34:15+5:302017-03-22T03:34:15+5:30
पंक्चरच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या उद्योगपतीच्या कारमधील पाच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी बिबवेवाडी

उद्योगपतीचे पाच लाख लंपास
पुणे : पंक्चरच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या उद्योगपतीच्या कारमधील पाच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर दुपारी घडली. ही कार चोरट्यांनीच पंक्चर करून तिचा पाठलाग केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी राकेश जैन (वय ४१, रा. बिबवेवाडी- कोंढवा रोड, मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री-पिसोळी येथे जैन यांची केमिकलची कंपनी आहे. कंपनीतील कामगारांच्या वेतनासाठी त्यांनी सोमवारी बँकेतून पाच लाख रुपये काढले होते. हे पैसे व महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी एका बॅगमध्ये ठेवून ही बॅग कारमध्ये ठेवली.
बँकेतून घरी जात असताना बिबवेवाडी - कोंढवा रोडवर त्यांची कार पंक्चर झाली. तिथून जवळच असलेल्या एका पंक्चरच्या दुकानासमोर त्यांनी कार उभी करून ते दुकानात गेले. ही संधी
साधत अज्ञातांनी कारचा दरवाजा उघडून आतमधील पैशांची बॅग लंपास केली. (प्रतिनिधी)