हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकासाठी ५ कोटी
By Admin | Updated: March 18, 2015 22:56 IST2015-03-18T22:56:30+5:302015-03-18T22:56:30+5:30
स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केल्याने गेल्या दीड वर्षापासून अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे़

हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकासाठी ५ कोटी
राजगुरुनगर : आश्वासनानुसार हुतात्मा राजगुरू यांच्या
स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केल्याने गेल्या दीड वर्षापासून अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे़ अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे राजगुरुनगरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, हुतात्मा राजगुरूप्रेमी संघटनांनीही समाधान व्यक्त केले.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म ज्या राजगुरुवाड्यात झाला त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानने १९८०च्या दशकात केली होती. तिला फलस्वरूप १९९५मध्ये मिळाले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी येथे कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी हा वाडा राष्ट्रीय स्मारक करीत असल्याची घोषणा केली. त्याबाबत शासकीय आदेश २००४मध्ये निघाला व वाडा राष्ट्रीय स्मारक झाले. पुढे त्याचे प्रत्यक्ष स्मारक उभे राहण्यात अनेक अडचणी येत राहिल्या.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे राजगुरुनगरला २००६मध्ये आले असताना त्यांनी दीड कोटी रुपये निधी स्मारकासाठी दिल्याची घोषणा केली. वाड्याचे संपादन, आराखडा आणि पुढे मान्यता-मंजुरी इत्यादी सर्व प्रक्रिया २००७मध्ये पूर्ण होऊन प्रत्यक्ष बांधकामाला २००८मध्ये सुरुवात झाली.
भारतीय पुरातत्त्व विभाग हे काम ठेकेदाराकरवी करीत होता. पुढे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबद्दल आंदोलन झाले. तसेच, आनंद गावडे यांनी यात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर ते बंद पडून अर्धवट राहिले. ठेकेदार न मिळणे, असलेल्या ठेकेदाराचा धरसोडपणा आणि निधीची अनुपलब्धता यांमुळे गेल्या दोन वर्षांपासून काम अतिशय संथ गतीने होत आहे.
गेल्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्मा राजगुरूंच्या जयंतीदिनी २४ आॅगस्ट रोजी वाड्याला भेट देऊन काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देऊन कामाला गती देण्याचे आणि भीमा नदीवर पूल करण्याचे आश्वासन दिले होते. सत्ताबदलानंतर आमदार सुरेश गोरे आणि भाजपाचे नेते शरद बुट्टे-पाटील यांनी जोरदार पाठपुरावा केला. नागपूरच्या अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी देण्याचे लेखी आश्वासन बुट्टे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळला दिले होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे दिवंगत खासदार बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी जानेवारी महिन्यात राजगुरुनगरला आले होते़, तेव्हा त्यांनी स्मारकाचा सुधारित आराखडा करून दर्जेदार स्मारक करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच, निधी कमी पडू देणार नाही, असेही आश्वासन दिले होते. बापट यांनी अर्थमंत्र्यांना पत्र देऊन ५ कोटी रुपये निधीची मागणीही केली होती. त्यानुसार या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी निधीची तरतूद केल्याने सर्व जण आनंदित झाले आहेत. (वार्ताहर)
वाड्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा
४हुतात्मा राजगुरूंच्या जन्मखोलीचे काम पूर्ण झाले असून, सध्या देवघराचे काम सुरु आहे. तसेच भीमा नदीच्या बाजूने संरक्षक भिंत अर्धवट झाली आहे.
४स्मारकामध्ये वाचनालय, संग्रहालय, हुतात्म्यांचा
पुतळा इत्यादी अनेक गोष्टी प्रस्तावित आहेत. वाड्याला जोडणारा पूल भीमा नदीवर प्रस्तावित आहे.
४एकूण ४८ कोटींचा आराखडा आहे. या वाड्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा आणि त्यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी व्हावी, अशीही मागणी आहे.
४राजगुरूंच्या नावाने अनेक संघटना स्थापन झाल्या. त्यांनी वेळोवेळी ही मागणी लावून धरली. हुतात्मा राजगुरू क्रांती संघाच्या वतीने आनंद गावडे यांनी ५ वेळा यासाठी हुतात्मा राजगुरू जयंती व पुण्यतिथीला उपोषण केले होते. तसेच, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीही अलीकडे याबाबत पाठपुरावा करीत होती.