जीवघेणे ४८ अपघाती ‘ब्लॅकस्पाॅट’ जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:29+5:302021-01-08T04:33:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात तब्बल ४८ ठिकाणी नियमित व मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, ही ठिकाणे ‘ब्लॅकस्पाॅट’ ...

48 accidents in 'Blackspot' district | जीवघेणे ४८ अपघाती ‘ब्लॅकस्पाॅट’ जिल्ह्यात

जीवघेणे ४८ अपघाती ‘ब्लॅकस्पाॅट’ जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात तब्बल ४८ ठिकाणी नियमित व मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, ही ठिकाणे ‘ब्लॅकस्पाॅट’ म्हणून जाहीर केली आहेत. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रादेशिक परिवहन, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली.

जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी ही सूचना केली. बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. बी. बी. आहुजा, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, “दर वर्षी ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जातो. यावर्षी ‘रस्ता सुरक्षा महिन’ साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. हे अभियान १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेऊन अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित विभाग, संस्था, संघटनांनी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करावी, तसेच घेण्यात येणारे उपक्रम वर्षभर सुरू ठेवावेत,” असे देशमुख म्हणाले. “बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावी. वैद्यकीय व्यावसायिकांनी या योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील व्यक्तींना त्वरित वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत,” असेही त्यांनी सांगितले. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी प्रास्ताविकात ‘ई चलान’द्वारे केलेल्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

Web Title: 48 accidents in 'Blackspot' district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.