सौर यंत्रणेसाठी महावितरणचे ४० टक्के अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:48+5:302021-09-02T04:23:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफ ...

40% subsidy from MSEDCL for solar system | सौर यंत्रणेसाठी महावितरणचे ४० टक्के अनुदान

सौर यंत्रणेसाठी महावितरणचे ४० टक्के अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफ टॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा (सोलर सिस्टिम) बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौर ऊर्जा यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात बचत होणार आहे. महावितरणकडून नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीजदेखील विकत घेतली जाणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘रुफ टॉप’ सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेतून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॉट क्षमतेची छतावरील (रुफ टॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्राकडून अनुदान मिळणार आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॉटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॉटपेक्षा अधिक ते १० किलोवॉटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॉटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॉट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था आणि निवासी कल्याणकारी संस्थांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.

रुफटॉप सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी महावितरणने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. त्याची यादी आणि ऑनलाईन अर्ज महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणेचे दर जाहीर करण्यात आले आहेत. उदा. या दराप्रमाणे ३ किलोवॉट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची १ लाख २४ हजार १४० रुपये किंमत राहील. यातील ४० टक्के म्हणजेच ४९ हजार ६५६ रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळेल आणि ग्राहकास प्रत्यक्षात ७४ हजार ४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल. रुफटॉप सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॉट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे साडेपाचशे रुपयांची बचत होऊ शकेल.

Web Title: 40% subsidy from MSEDCL for solar system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.