४० टक्के सहकारी संस्था कागदावरच
By Admin | Updated: June 30, 2015 00:46 IST2015-06-30T00:46:46+5:302015-06-30T00:46:46+5:30
राज्यात सध्या तब्बल २ लाख ३० हजार २९५ नोंदणीकृत सहकारी संस्था असून, त्यांतील तब्बल ४० टक्के संस्थांचे अस्तित्व केवळ कागदावरच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

४० टक्के सहकारी संस्था कागदावरच
पुणे : राज्यात सध्या तब्बल २ लाख ३० हजार २९५ नोंदणीकृत सहकारी संस्था असून, त्यांतील तब्बल ४० टक्के संस्थांचे अस्तित्व केवळ कागदावरच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे सहकार विभागाच्या वतीने राज्यातील सर्व नोंदणीकृत सहकारी संस्थांची प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्यासाठी येत्या १ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती सहकार आयुक्त चंद्रकात दळवी यांनी दिली.
सहकार विभागाच्या वतीने ई-सहकार या संकेतस्थळावर आपली माहिती (प्रोफाईल) उपलब्ध करून दिली असून, अत्यल्प संस्थांनी आपल्या ताळेबंदाची माहिती संकेतस्थळावर दिली आहे.
अनेक संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभादेखील होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ कागदोपत्री अस्तित्व ठेवून अनेक संस्थांनी आपले कामकाज बंद केले आहे. सर्वेक्षणानंतर ज्या संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणी नाही, अशा संस्थांची नोंदणी जाहीर प्रकटनाद्वारे प्रसिद्धी देऊन रद्द करण्यात येईल.
यामुळे बोगस व कार्यरत नसलेल्या संस्थांची संख्या कमी होऊन सहकार विभागाला शिल्लक राहिलेल्या सहकारी संस्थांची गुणात्मक वाढ करण्यासाठी
मदत होणार आहे. तसेच, राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय
घेताना संस्थांची अद्ययावत व
अचूक माहिती उपलब्ध होणार
आहे. (प्रतिनिधी)