एमपीएससीच्या परीक्षेला ४० टक्के उमेदवार गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST2021-09-05T04:15:46+5:302021-09-05T04:15:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या दीड-दोन वर्षांत कोरोनामुळे तब्बल १६ वेळा पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची दुय्यम सेवा अराजपत्रित ...

एमपीएससीच्या परीक्षेला ४० टक्के उमेदवार गैरहजर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या दीड-दोन वर्षांत कोरोनामुळे तब्बल १६ वेळा पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा शनिवार (दि.४) रोजी पुण्यासह राज्यभरात सुरळीत पार पडली. मात्र, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्यांपैकी सुमारे ६० टक्के उमेदवारांची उपस्थिती होती आणि ४० टक्के गैरहजर होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यभरातील १ हजार १६४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण अशा विविध कारणांमुळे एकूण सहावेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली. ही परीक्षा घेण्यासाठी उमेदवारांनी मार्चमध्ये पुण्यात तीव्र आंदोलनही केले होते. एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी सुमारे 3 लाख 82 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वाधिक उमेदवार नोंदणी आणि सर्वाधिक परीक्षा केंद्रे होती.
संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यात सर्वाधिक ४२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली असून, जवळपास १४ हजार उमेदवार गैरहजर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. पुण्यात परीक्षेसाठी उपस्थितांचे प्रमाण ६५ टक्क्यांच्या आसपास होते.