गंडा घालणाऱ्याला ४ वर्षांची सक्तमजुरी
By Admin | Updated: January 7, 2015 00:45 IST2015-01-07T00:45:20+5:302015-01-07T00:45:20+5:30
अनेकांना गंडा घालणाऱ्या एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. झांबरे यांनी ४ वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

गंडा घालणाऱ्याला ४ वर्षांची सक्तमजुरी
पुणे : जाहिरात देऊन १११ दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. झांबरे यांनी ४ वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी ९ महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.
अमनकुमार हरीश्वर पांडे ऊर्फ अमनकुमार राजेश्वर पांडे (रा. कडीर्ले निवास, साईनगर, चंदननगर, मूळ रांची व झारखंड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी राजेंद्र सुंदरलाल काची (५१, रा. नाना पेठ) यांनी लष्कर पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी पांडे याने २०१०मध्ये महात्मा गांधी रस्त्यावरील स्टर्लिंग सेंटरमधील एका कार्यालयात युनायटेड इस्टेट इन कॉपोर्रेशन नावाने कार्यालय सुरू केले. या कार्यालयात शहरातील मुलींना कामाला ठेवले. त्याने जानेवारी २०१०मध्ये एका दैनिकात जाहिरात दिली. या जाहिरातीमध्ये जेवढी रक्कम गुंतवाल, त्यांच्या दुप्पट रक्कम १११ दिवसांत रोख किंवा चेकने देण्याचे आमिष दाखविले. वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून फिर्यादी राजेंद्र काची ११ जानेवारी २०१० रोजी पांडेच्या कार्यालयात गेले. पांडे याने काची यांचा विश्वास संपादन केला. त्या वेळी काची यांनी २ लाख ५० हजार रुपये भरले. पांडे याने काचींना पैसे मिळाल्याची पावती देऊन ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर करार केला. त्याच वेळी लगेचच आरोपीने काची यांना ५ लाखांचा धनादेश दिला. धनादेश न वटल्याने काची यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. बी. आर. पाटील यांनी ८ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादीसह फसवणूक झालेले इतर तीन जण, तपास अधिकारी, आरोपीला भाडेतत्त्वावर कार्यालय देणारे मालक यांची साक्ष महत्त्वाची ठरली. (प्रतिनिधी)
४काची यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपी पांडे याने दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून १०१ लोकांना ३ कोटी ३५ लाख ६६ हजार ३०१ रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर एका वर्षानंतर १६ जुलै २०११ रोजी पोलिसांनी त्याला डाल्टनगंज येथून अटक केली.