पुणे : बाणेर, बालेवाडी, सूस भागातील सांडपाणी वाहिनी बदलणे, पावसाळी गटार टाकणे, रस्ते डांबरीकरण करणे, रस्ते विकसित करणे, खड्डे बुजविणे या कामांसाठी तब्बल ३८.५० कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी समाविष्ट गावांतील रस्ते आणि पाणीपुरवठ्याचा निधी वळविण्यात आला आहे. महापालिकेत प्रशासकराज असताना निधी पळवापळवीचा प्रकार सुरू आहे.
पुणे महापालिकेच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये पाणीपुरवठ्याचा मास्टर प्लॅन तयार करणे यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. पाणीपुरवठा करणे या कामासाठी १० कोटी, शहराच्या विविध भागांतील रस्ते डांबरीकरण करणे १८.५० कोटी अशी एकूण ३८.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांपैकी सूस, म्हाळुंगे, लोहगाव, वाघोली या गावांचा पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार झाला आहे. तेथे कामही सुरू झाले आहे; पण खडकवासला, धायरी, नऱ्हे, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आंबेगाव या गावांचा अजूनही आराखडा तयार झालेला नाही. या गावांमधील रस्त्यांची स्थिती वाईट असल्याने तेथे डांबरीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली होती. शहरातील प्रत्येक भागात निधीची गरज असताना बाणेर, बालेवाडी, सूस भागातील काही माननीयांनी नेत्यांचा दबाव आणून या भागासाठी खास निधी मंजूर करून घेतला आहे.
लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार निधीचे वर्गीकरण केलेले आहे. वर्गीकरण केलेला निधी योग्य ठिकाणी खर्च पडतो की नाही, ज्या कामासाठी निधी दिला आहे. तेथे काम झाले की नाही, याची तपासणी केली जाईल. - डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका