बिहारमधून पळवलेल्या मुलीची सुटका ३६ दिवस आईवडिलांच्या डोळ्यांत पाणी

By Admin | Updated: May 6, 2014 18:40 IST2014-05-06T18:24:07+5:302014-05-06T18:40:27+5:30

लोणी काळभोर : दरभंगा (बिहार) येथून ३६ दिवसांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करून आणलेल्या १७ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस लोणी काळभोर पोलिसांनी तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिली असून, अपहरणकर्ता मात्र फरार झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिली.

36 year old girl rescued from her father's eyes | बिहारमधून पळवलेल्या मुलीची सुटका ३६ दिवस आईवडिलांच्या डोळ्यांत पाणी

बिहारमधून पळवलेल्या मुलीची सुटका ३६ दिवस आईवडिलांच्या डोळ्यांत पाणी

लोणी काळभोर : दरभंगा (बिहार) येथून ३६ दिवसांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करून आणलेल्या १७ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस लोणी काळभोर पोलिसांनी तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिली असून, अपहरणकर्ता मात्र फरार झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिली.
या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, उर्दू बजार दरभंगा (बिहार) येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलीची शाळेत ये-जा करताना आळीत मामा-मामीकडे राहत असलेल्या मोहम्मद युसूफ याच्याशी ओळख झाली. कसलाही कामधंदा करत नसलेल्या मोहम्मदने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आपण लग्न करू तुला मी सुखात ठेवीन, असे गोड बोलून १ एप्रिल रोजी तो तिला घेऊन दरभंगा येथून हैदराबाद येथे आला.
शाळेत गेलेली मुलगी सायंकाळपर्यंत घरी आली नाही, हे पाहून शासकीय नोकरीत असलेल्या तिच्या वडिलांनी आपले नातेवाईक व तिच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. परंतु, कसलीही माहिती न मिळाल्याने २ एप्रिल रोजी त्यांनी लेहरीचा सराय पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत १ एप्रिलपासून मोहम्मद युसूफ हासुद्धा गायब असल्याची माहिती पुढे आली. त्याच्या मामा-मामींकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलीस घेऊन मोहम्मद महाराष्ट्रात आल्याचे समजले.
मोहम्मद याचा मोबाईल क्रमांक नातेवाइकांकडून मिळाला होता. पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स काढले. यावरून तो लोणी काळभोर परिसरात असल्याची माहिती मिळाली म्हणून लेहरीचा सराय पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रमा मानजी हे आज पहाटे मुलीच्या आईवडिलांसमवेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आले. येथील पोलीस हवालदार सुरेश होले व क्षीरसागर यांची मदत घेऊन मुलीचा शोध घेतला असता ती घोरपडेवस्ती येथे एका खोलीत आढळून आली. परंतु पोलिसांची चाहूल लागताच मोहम्मद पळून गेला.
तब्बल छत्तीस दिवसांनंतर आई व मुलीची भेट झाल्याने दोघींच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. मुलगी शोधून दिल्याबद्दल तिच्या नातेवाइकांनी लोणी काळभोर पोलिसांचे आभार मानले.

Web Title: 36 year old girl rescued from her father's eyes