महापालिका तिजोरीत १ दिवसात ३६ कोटी

By Admin | Updated: November 12, 2016 07:12 IST2016-11-12T07:12:32+5:302016-11-12T07:12:32+5:30

महापालिकेने थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या कोणत्याही अभय योजनेला मिळाला नाही इतका प्रतिसाद ‘हजार-पाचशेच्या नोटा कर जमा करण्यासाठी चालतील

36 crores in the 1st day of the municipal trips | महापालिका तिजोरीत १ दिवसात ३६ कोटी

महापालिका तिजोरीत १ दिवसात ३६ कोटी

पुणे : महापालिकेने थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या कोणत्याही अभय योजनेला मिळाला नाही इतका प्रतिसाद ‘हजार-पाचशेच्या नोटा कर जमा करण्यासाठी चालतील’ या केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेला शुक्रवारी एका दिवसात मिळाला. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात तब्बल ३६ कोटी ६१ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. दिवसभरात १२ हजार १५१ जणांनी कर जमा केला.
केंद्र सरकारने मंगळवारी (दि. ८) रात्री ८ वाजता १ हजार व ५०० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करीत असलेल्या महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे सर्व व्यवहारच त्यामुळे ठप्प झाले. त्याची दखल घेत केंद्र सरकारच्या वित्त विभागाने सरकारी कर जमा करण्यासाठी १ हजार व ५०० रुपयांच्या नोटा ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत चालतील असे जाहीर केले. त्याचा फायदा घेत अनेकांनी शुक्रवारी थकीत कराचा भरणा केला. ही मुदत १४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत वाढवली असल्याचे केंद्र सरकारने सायंकाळी जाहीर केले. त्यामुळे आता थकबाकीदारांना यातून रद्द झालेल्या नोटा खपविणे शक्य होणार आहे.
शुक्रवारी सकाळी कर जमा करण्यासाठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातील एकूण २६ कर भरणा केंद्रांवर ७२ काऊंटर सुरू केले. ते सकाळी ८ ते रात्री १२ पर्यंत खुले राहतील, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सकाळी ८ वाजण्याच्याही आधीपासून नागरिकांनी या केंद्रांवर रांगा लावण्यास सुरुवात झाली. नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये झाली तशीच गर्दी पालिकेच्या या केंद्रांमध्ये होती. केंद्र सुरू होताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बिल पाहून पैसे जमा करून घेण्यास सुरुवात केली.
रात्री ९ वाजताही महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कर भरणा कार्यालयात नागरिकांची गर्दी होती. केंद्राने जाहीर केले आहे त्याप्रमाणे कर भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत आहे. तोपर्यंत येणाऱ्या एकाही नागरिकाला परत पाठविले जाणार नाही, असे आयुक्तांनी सांगितले. आदेश येत नाही तोपर्यंत मुदतवाढ देता येणार नाही, असे ते म्हणाले.


...अन् रखडलेले वेतन खात्यात जमा
मागील काही महिन्यांपासून रखडलेले वेतन कोणत्याही आंदोलनाशिवाय खात्यात जमा होत असल्याचा सुखद धक्का शिक्षक, कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे. शहरातील काही खासगी शिक्षणसंस्था तसेच रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’चा अनुभव येत आहे. केंद्र सरकारने ५०० आणि एक हजार रुपयांचा नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही शिक्षणसंस्थांकडून रखडलेले वेतन देणे सुरू केले आहे.
काही शिक्षणसंस्था तसेच रुग्णालयांकडून विविध कारणे पुढे करत शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन महिनोन्महिने थकविले जाते. त्यासाठी शिक्षकांना आंदोलनही करावे लागते. तरीही काही निर्ढावलेल्या शिक्षणसम्राटांकडून त्याला दाद दिली जात नाही. त्यामुळे त्यांना चार-पाच महिने वेतनापासून वंचित राहावे लागते. वेतनापैकी काही पैसे देऊन त्यांना गप्प बसविले जाते. मात्र, केंद्र सरकारने मंगळवारी ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार घेतल्यानंतर या शिक्षक व कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’ येऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. काही बड्या शिक्षणसंस्थांनी तीन-चार महिन्यांपासून रखडलेले वेतन दोन दिवसांपासून शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
एका शिक्षणसंस्थेतील कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संस्थेतील बहुतेक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासूनचे वेतन रखडले होते. या महिन्यातही हे वेतन होण्याची शक्यता धूसर होती. मात्र, सरकारच्या निर्णयानंतर दोन दिवसांपासून काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात रखडलेले सर्व वेतन जमा होऊ लागले आहे. त्यामुळे संबंधितांना सुखद धक्का बसत आहे.


घाऊक बाजारातील उलाढाल मंदावली
पुणे : चलनातून ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने घाऊक बाजारातील उलाढाल मंदावली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला, फळे आणि भुसार बाजारातील मालाच्या विक्रीवर मर्यादा आल्याने बाजारात माल विक्रीविना जागेवर राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच शेतमालाच्या भावावरही परिणाम झाला असून, नेहमीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी भाव कमी मिळत आहे.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात शेतमालाची तसेच भुसार मालाची आवक होत असते. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल या घाऊक बाजारात होते. मात्र, बुधवारपासून ही उलाढाल रोडावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर बुधवारपासून तरकारी, कांदा व बटाटा विभाग, फळ विभाग आणि फुल बाजारामध्ये रोजच्या प्रमाणेच आवक झाली असली तरी विक्री मात्र अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. ग्राहकांकडून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा असल्याने विक्री होऊ शकली नाही तर काही विभागामध्ये या नोटा रद्द केल्याने ग्राहकच माल खरेदीसाठी फिरकले नाही.
फळांचे व्यापारी युवराज काची म्हणाले, की दररोज मालाची आवक नियमितपणे होत नाही. मात्र, खरेदीदारांकडून अपेक्षित खरेदी होत नाही. त्यांच्याकडे ५०० आणि १ हजारच्या नोटा असल्याने बंधन आले आहे. केवळ काही जणांना उधारीवर मालाची विक्री केली जात आहे. शेतकरीही मालाची पट्टी रोख स्वरूपात घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे.

Web Title: 36 crores in the 1st day of the municipal trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.