वर्षभरामध्ये जिल्ह्यात ३३६ अर्भकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 03:49 IST2016-01-14T03:49:42+5:302016-01-14T03:49:42+5:30

वर्षभरापूर्वी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यापुढे एकही बाल व मातामृत्यू होणार नाही, असे आश्वासन दिले असतानाही जिल्ह्यात

336 infant deaths in the district in a year | वर्षभरामध्ये जिल्ह्यात ३३६ अर्भकांचा मृत्यू

वर्षभरामध्ये जिल्ह्यात ३३६ अर्भकांचा मृत्यू

पुणे : वर्षभरापूर्वी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यापुढे एकही बाल व मातामृत्यू होणार नाही, असे आश्वासन दिले असतानाही जिल्ह्यात गेल्या वर्षभरात प्रसूती दरम्यान ३३६ बालकांना, तर आठ मातांना आपला जीव गमवावा लागला आहे. २०१४ च्या तुलनेत मात्र हे प्रमाण कमी आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिपोर्ट कार्डमध्ये राज्यात प्रथम क्रमांक, २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे एनएबीएच या राष्ट्रीय नामांकनासाठी अर्ज दाखल, कायापालट योजनेंतर्गत ५० केंद्रांची भौैतिक व आरोग्य सुविधा दर्जेदार, सीसीटीव्ही यंत्रणा व ८३ केंद्रांमध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सिग आदी दर्जेदार आरोग्य सेवेचा आलेख चढता असला, तरी म्हणावे तसे बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले नाही.
जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंदे्र आहेत. याच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा दिल्याचा दावा पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत केला जात आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेर १७ लाख ३० हजार १८८ बाह्यरुग्णांची तपासणी, तर १४ लाख ३० हजार ६० आंतररुग्णांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. यात ४६ हजार ८८९ प्रसूती आरोग्य केंद्रांमध्ये, तर १८८ प्रसूती घरी करण्यात आल्या आहेत. ४७ हजार ४४६ बालकांचा जन्म झाला असून, यात २२ हजार २९९ मुली, तर २५ हजार १४७ मुले आहेत. मात्र, ३३६ अर्भकांचा या जगात येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर मृत्यू झाला आहे. तसेच, आठ मातांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक ७५ अर्भकमृत्यू पुणे शहरालगत असलेल्या व उपनगर होत असलेल्या हवेली तालुक्यात असून, खेड तालुक्यात ४५ आहे़
सर्वांत कमी ३ वेल्हे व मुळशी तालुक्यात मृत्यू झाले आहेत. २०१४ - १५ मध्ये मार्चअखेर हे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा जास्त होते. या वेळी ५७३ अर्भकमृत्यू व १४ मातामृत्यू झाल्या होत्या. (प्रतिनिधी)

लिंग गुणोत्तरही झाले कमी
२०१४-१५मध्ये नकोशी हवी-हवीशी झाली होती. जिल्ह्यात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत स्त्रीजन्माच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होऊन ते हजारांमागे ९00 पर्यंत गेले होते. मात्र, २०१५-१६मध्ये पुन्हा ते कमी होऊन ८८७ वर आले आहे. डिसेंबरअखेर ४७ हजार ४४६ बालकांचा जन्म झाला, यात २२ हजार२९९ मुली, तर २५ हजार१४७ मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दुर्गम अशा वेल्हे तालुक्याने मुलींचे स्वागत करण्याचे प्रमाण कायम ठेवत १०१० इतके राखले आहे. तालुक्यात २०१ बालकांनी जन्म घेतला. त्यात १०१ मुली, तर १०० मुले जन्मली आहेत.

बाल व मातामृत्यू रोखणे हे आमचे काम आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ते रोखण्यासाठी आम्ही दर्जेदार आरोग्य सेवा पुरवित आहेत. १ लाखामागे देशात १००, राज्यात ६५, तर पुणे शहर व जिल्ह्यात ४५ असे अर्भकमृत्यूचा सध्याचे प्रमाण आहे.
डॉ. भगवान पवार, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद


आंबेगाव२८
बारामती३१
भोर१३
दौंड२२
हवेली ७५
इंदापूर३५
जुन्नर३२
खेड४५
मावळ१०
मुळशी३
पुरंदर२२
शिरुर१७
वेल्हे३
एकुण३३६

Web Title: 336 infant deaths in the district in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.