जिल्हाबाह्य ३१ शिक्षकांच्या बदल्या वादात

By Admin | Updated: June 20, 2015 01:07 IST2015-06-20T01:07:21+5:302015-06-20T01:07:21+5:30

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाला पुण्याच्या शिक्षण मंडळ शाळेमध्ये बदली देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी

31 teacher transfers dispute outside the district | जिल्हाबाह्य ३१ शिक्षकांच्या बदल्या वादात

जिल्हाबाह्य ३१ शिक्षकांच्या बदल्या वादात

पुणे : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाला पुण्याच्या शिक्षण मंडळ शाळेमध्ये बदली देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पुणे महापालिका शिक्षण मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र, या बदलीबरोबरच आणखी ३० शि़क्षकांच्या बदल्यांना आठ दिवसांपूर्वीच प्रशासकीय धोरणाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे या बदल्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
शिक्षण मंडळाचा कारभार मागील वर्षी महापालिका प्रशासनाकडे आल्यानंतर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या बदल्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून थांबविण्यात आला होता. मात्र, शाळा सुरू होऊन शिक्षकांची गरज असल्याचे कारण पुढे करून या बदल्यांना मान्यता घेण्यात आली असल्याची माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे या बदली प्रकरणी आणखी मोठे गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नोकरी करणाऱ्या एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या शिक्षकाची पत्नी पुणे शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये शिक्षिका आहे. त्यामुळे या शिक्षकाने पुण्यात बदली मागितली होती.
पुणे शिक्षण मंडळाची त्याला अनुमती आवश्यक होती. त्यासाठी प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ (अध्यक्ष), रवींद्र चौधरी (माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य), संतोष मेमाणे (लिपिक) आणि भाऊसाहेब बाबासाहेब भापकर (मध्यस्थ) यांनी संबधित शिक्षकाकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
आठ दिवसांपूर्वीच ३१ बदल्यांना मान्यता
-सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनच्या एका बदल्यांच्या आदेशानुसार, ज्या शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी अथवा पत्नी महापालिकेच्या सेवेत असल्यास त्याच्या पती अथवा पत्नीला पालिका सेवेत बदली करून घेता येते.
-या आदेशानुसार, शिक्षण मंडळात जिल्हाबाह्य बदल्यांसाठी ३१ अर्ज आले होते. त्यांतील २८ अर्ज मराठी माध्यमासाठी, तर ३ इंग्रजी माध्यमासाठी होते. धोरणात्मक मान्यतेचा प्रस्तावही महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.
-मात्र, महापालिका शाळांना नेमकी किती शिक्षकांची गरज आहे? तसेच शाळांची पटपडताळणी झाली नसल्याने हा प्रस्ताव बाजूला ठेवला होता.
-दरम्यानच्या काळात शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना, शिक्षकांची गरज असल्याचे कारण पुढे करून या बदल्यांना
मान्यता देण्यात आली आहे. त्यातच या बदलीचाही समावेश होता.

बदल्यांना संशयाचा धूर
-राज्य शासनाच्या नियमानुसार तसेच त्यांनी दिलेल्या अटीनुसार या बदल्यांना महापालिका आयुक्तांनी धोरणात्मक मान्यता दिली होती. त्यानंतर या शिक्षकांशी संपर्क साधून त्यांना बदलीचे पत्र देण्याची जबबादारी शिक्षण मंडळाकडे असते.
-त्यानुसार, महापालिका आयुक्त कार्यालयाकडून ही धोरणात्मक मान्यता देऊन तो प्रस्ताव मंडळाला पाठविण्यात आला होता.
-त्यामुळे मंडळाकडून किती जणांना ही बदलीची पत्रे देण्यात आली आहेत? त्यात काही गैरव्यवहार झाला आहे का? असेल तर कोण सामील आहे? किती गैरव्यवहार झाला आहे? याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-त्यामुळे या बदल्याही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली असून, शिक्षण मंडळाचे आणखी काही कर्मचारी तसेच राजकीय पदाधिकारीही या बदली प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: 31 teacher transfers dispute outside the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.